हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२

उशीर


नभ काळवंडले अन् अंधारल्या दिशाही, ऊर्जा मनात वसण्या आता उशीर झाला
घेऊन जा मला तू मंगल तुझ्या घराला, येथे निवास करण्या आता उशीर झाला

क्षण कोवळे सुखाचे, सहवास तो तपांचा अन् ...आठवी मला तो...संसार काळजांचा

गेलीस तू सुखाने, राही प्रवास माझा...स्वप्ने नवीन बघण्या आता उशीर झाला

आता पिलांस अपुल्या बघ पंख दिव्य फुटले, घेती नभी भरारी, माझ्यात चित्त कुठले!

उत्पत्ति लय स्थिती हे तर खेळ सावल्यांचे, माझी स्थिती निवडण्या आता उशीर झाला

होतो भ्रमिष्ट थोडा अन् कापतो जरासा...श्वासागणीक दमतो...मी...टाकतो उसासा

मी चेहरे विसरतो...विसरून नाव जातो; तपशील सर्व स्मरण्या आता उशीर झाला

ऐकू मला अचानक जी हाक गोड येते; यमदूत मारतो ती...तुझिया स्मृतीत नेते

होईल त्रास थोडा..होतील वेदना पण...मागे फिरून बघण्या...आता उशीर झाला

- निलेश पंडित

२२ ऑक्टोबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा