हा ब्लॉग शोधा

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

भाग्य


विशाल पडद्यासारख्या
मोठमोठया कोळिष्टकांमधून
गुंफेमधे येणारा
लख्ख सूर्यप्रकाश
त्या प्रकाशात ठळक उठून दिसणारी
कोळिष्टकं

पायाला हवाहवासा
शीतल स्पर्श पाण्याचा ...
कधी पायाचे हलके चावे घेणारे
चिमुकले मासे

कधी झऱ्याच्या त्या
स्वच्छ वाहत्या पाण्यातही
पाय घसरावा असं
आडमुठेपणानं साचलेलं शेवाळं
मात्र त्याच वेळी
हाताला मिळणारा
अणकुचीदार शुष्क
टोचणाऱ्या बोचणाऱ्या खडकांच्या
ठाम भिंतींचा आधार

वाटलं ...
हे सारं मिळणं
हे केवढं मोठं भाग्य माझं
जेव्हा ऐकल्या कथा
वाळवंटात उघड्यावर पडलेल्या
.... आणि तशाच ...
समुद्रात बुडून जगाला न दिसता
लुप्त झालेल्या
सांगाड्यांच्या!


- निलेश पंडित
१३ नोव्हेंबर २०१८

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८

चिकित्सा


मार्ग थोरांचा कुणी चोखाळणे अत्यंत विरळा
सहज जमते चौथऱ्यावर बांधणे निर्जीव पुतळा

वर्णने इतिहास देतो राजहंसाच्या रुपाची
तोच पूर्वज आमचा म्हणण्यास असतो सज्ज बगळा

भेटताना शेवटी नजरानजर होती नकोशी
आजही अवघड क्षणी गेला तुझ्या डोळ्यांत धुरळा

कोण मेले कोण जगले कोण जखमी पाहिले मी
हे तसे दुय्यम महत्त्वाचा पुरेसा उग्र मथळा

खूप सोपी धोरणे संवाद येथे साधण्याची
जे हवे ते बोलणाऱ्यावर इथे विश्वास सगळा

कोणत्याही कूट प्रश्नाची सहज टाळा चिकित्सा
देशभक्ती त्यात मिसळा आणि मग भरपूर उकळा


- निलेश पंडित
९ नोव्हेंबर २०१८

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

कथा

श्वापदांना मारले अन् जंगलेही जाळली
माणसे पण हिंस्त्र नंतर माणसांनी पाळली

ना कुणी सुलतान ना राजा कुणी ह्या वल्गना
कोणती ना कोणती शाही जिथे कवटाळली

त्या महात्म्याने जगासाठीच लिहिली पुस्तके
अन् जगाने शेवटी ती जाळली वा टाळली

मीपणा त्यागा असे प्रतिपादले ज्यांनी कुणी
नेहमी त्यांनी अहंता आपली कुरवाळली

नेहमी त्यांनी अहिंसेचीच महती मानली
माणसे हिंसक खुनी पदरी जरी सांभाळली

तो म्हणाला देवता प्रत्येक स्त्री दिसते मला
आणि मग जमले तसे प्रत्येक स्त्री न्याहाळली

उंटअरबाची कथा दिसते जिथे जावे तिथे
सारुनी कवितेस बाजूला गझल बोकाळली

अन्न द्यावे ज्या मुळांनी रक्त त्यांनी शोषले
नवल नाही खोड पूर्वी साल आता वाळली


- निलेश पंडित
४ नोव्हेंबर २०१८

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

भुरळ


उंचावरून लांबून थोडे
बघता जगण्याचे मी घोडे
दामटलेले धकाधकीत
सतत कसल्याशा नशेत
अपूर्ण आणि अधुरे काही
करते देहमनाची लाही
अगम्य नेमके काय ते हे
कोडे अखंड पडून राहे

अकल्पित जगण्याची कास
घट्ट धरूनच हमखास
मोकळ्या पठारावरती मी
त्रस्त कुडकुडता नेहमी
संगतीस विरळाच कुणी
तोही केव्हा बेरकी धोरणी
एकटेपण साथीस नित्य
हेच एरवी शाश्वत सत्य

मात्र भुरळ घाले मनास
शुद्ध हवेतील खुला श्वास
कधी स्थिर कधी गतीमान
दिशा हवी ती वा दिशाहीन
कुणीही न स्पर्शिलेली हवा
देत बोचरासा जोम नवा
जेव्हा फुलवेल व संपेल
काही अपूर्णही न उरेल


- निलेश पंडित
३ नोव्हेंबर २०१८

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

बदल


(वृत्त: मदनरंग)

पारखून मन माझे मी संतत मांडले
तेच जरी शब्द अर्थ भाव जाणिवेतले
... रूपवेध वेगवेगळा हरेक भासता
आकळेन पूर्ण मी ... मला सदैव वाटले

सापडलो जितका तितकाच गूढ मात्र मी
टाकतो स्वत:स नित्य नवनवीन संभ्रमी
... गवसताच गोंधळतो ... दोन्ही एका क्षणी
रुक्ष खरबरीत कधी आणि कधी रेशमी

मीच नव्हे सर्व मला मात्र ह्यात जग कळे
भलाबुरा अंश स्वत:चाच जणू आढळे
... भले अंश हे सारे फक्त मीच जाणतो
विश्वच अवघे मनात उगवे अन् मावळे

पारखून मांडण्यात हरवतो व गवसतो
अंश अंश मी मलाच अन् जगास बदलतो


- निलेश पंडित
२२ आॅक्टोबर २०१८

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

अर्थवाही


हिंस्त्र जलचर खोलवर सगळीकडे दडतात काही
राजकारण नेमके डावे व उजवे असत नाही

सावल्या मोठ्या तशा प्रतिमा बड्या करते प्रसिद्धी
मात्र देतो श्वापदांची आतल्या इतिहास ग्वाही

खूप मोठ्या संस्कृतीच्या गौरवास्पद थोर गाथा
पण नकाशा वा गती गंतव्य वा नसते दिशाही

सत्य ज्यांनी लपविले ते शेवटी सत्तेस मुकले
फक्त खोटे बोलण्याची लागते अंगी कलाही

ती अनर्थाचेच क्षण आयुष्यभर जगली व गेली
कारणाने ह्या तिची कविता असावी अर्थवाही


- निलेश पंडित
१९ आॅक्टोबर २०१८