हा ब्लॉग शोधा

विरह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १६ जून, २०१८

भर

स्पर्श स्पर्शाला मिळावा
जीव अवघा मोहरावा

क्षण जुना क्षणभर गवसता
मूक अश्रू ओघळावा

आठवण यावी अचानक
त्याच वेळी फोन यावा

भास मग सहवास थोडा
लाभल्यानंतर उरावा

उष्णता अन् ऊब जपता
एक भडकाही उडावा

डायरीचा भाग कोरा
नेहमी माझा असावा

मी विरावे तू उरावे
भर स्मृतींचा ओसरावा


- निलेश पंडित
१७ जून २०१८

क्षुद्र

तपे लोटली ...

माफक पण नेमके शब्द वापरून जेव्हा
विचारले मी
जरा चाचरत

क्षणभरात अन्
रोखठोक "नाही"च तरी ते
फेकलेस तू
हसून छद्मी
अंगावरती

... आणि कास धरलीस पुढे तू
सुजलेल्या बेगडी जगाच्या
फसफसणाऱ्या उत्कर्षाची

पुरती क्षुद्रच
ठरलीस जशी
तसे लगोलग
दीर्घकाळ मी
तुझ्या नि माझ्या
आठवणींना
कोपऱ्यातल्या
अडगळीत पण
नेहमीच जपलेले होते
(शक्यच नव्हते काही दुसरे!)
सन्मानाने

... काल अचानक
जेव्हा मी वाचली बातमी
तुझ्या नशेच्या गर्तेमधल्या
खंगत खुरडत जगण्याची पण
अजूनही बाहेर नेहमी
पैसे उधळत
लखलखाट पांघरून वरवर वावरण्याची
तगमगण्याची तडफडण्याची ...

तेव्हा का उमटली सुप्तशी
खोल मनाच्या
गाभ्यामध्ये
आनंदाची लहर अचानक
जरी चेहऱ्यावरती माझ्या दिसली नाही

क्षुद्र नेमके
कोण ... मनाला
कायमचे हे कोडे आहे
पडले आता


- निलेश पंडित
१६ जून २०१८

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

दाह

लगबगीने टाळ वा रंगून रेंगाळून जा
भेटताना टाळताना मात्र पडताळून जा

एकदा मनसोक्त भर काया सुगंधाने जरा
पाकळी अन् पाकळीने फूल चुरगाळून जा

नेहमी मी दाह वा भडका तरी सोसू किती
मोकळे सर्वांग कर पुरते मला जाळून जा

लोकलज्जेने किती वहिवाट घुसमट ही इथे
धाडसाची वाटही जगण्यात चोखाळून जा

आक्रमक मीही अचानक एकदा होईन बघ
त्या क्षणी तूही बदल लाजून ओशाळून जा

विखुरलो तुटलो नि जगलो थंड रक्ताने पुढे
दोन क्षण जुळवू पुन्हा आजन्म वाफाळून जा


- निलेश पंडित
१६ फेब्रुवारी २०१८

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

विस्तार

कोण मी होतो कसा काही तुला स्मरणार नाही
आठवण देवाणघेवाणीतला व्यापार नाही

मौन तू का पाळले होतेस शेवटच्या क्षणीही
जोडलेले तोडणारे मौन हे अवजार नाही

नेमके जमलेच नाही सांगणे तू आणि मीही
व्यक्त हा होईल शब्दांनी असा शृंगार नाही

दोन नजरा दोन अश्रू एकमेकांच्या दिशेने
ह्या वियोगातील आवेगात हाहाकार नाही

हे तुला कळलेच नाही विस्मृती हे भाग्य मोठे
नाव ना ना चेहराही अन् स्मृतींचा भार नाही

'पंडिता'च्या जीवनाची चोख होते आज व्याख्या
ना कुठे रुंदी न खोली अन् कुठे विस्तार नाही


- निलेश पंडित
१४ जानेवारी २०१८

सोमवार, २७ जून, २०१६

ताबा


इतक्या वर्षांनंतर
बरंच काही
बदलूनही
जणू नाहीच बदललं काही
अशीच करारी, जबाबदार
होतीस तू

आपलं अचानक
कुठल्याशा कार्यक्रमात भेटणंही
जणू आयुष्याच्या
इतर सर्व अव्ययांप्रमाणेच
असावं नियंत्रणात तुझ्या
(आणि
कधी मीही हवा होतो जसा)
तसं होतंही कदाचित्

ताठ मान
कधी न न पाहिलेल्या
श्रीमंतीचा रुबाब
नवऱ्याचा टाय मधेच
त्यालाही जाणीव होण्याआधीच
झपाट्यानं नीट करण्याची ढब
सर्व उमरावांमधे वावरण्याची
सफाईदार पद्धत

फक्त
चुकार पाखरासारखी
अचानक तुझा ताबा
सोडून धावणारी नजर
आणि त्या नजरेला
लगडलेलं
तेच जुनं मन
वगळता


- निलेश पंडित
२७ जून २०१६

शनिवार, २ जानेवारी, २०१६

चव


जागत्या आहेत जखमा आजही माझ्या जिव्हारी
जंबिया जिवणीत दडलेला तुझ्या होता दुधारी

प्रश्न होता फक्त तू वेळीच काही सांगण्याचा
लाजरी होतीस तू अन् मी जरा पडलो करारी

रोज सावरतो मनाला वाचुनी पत्रे जुनी मी
वाटते नशिबात आहे अमृताची चव विषारी

पापण्यांशी साचले आहेत नकळत फार अश्रू
वाटते तांडा स्मृतींचा येत आहे आज दारी

सौख्य ते कवितेत तू लिहितेस जे तुजला मिळाले
दु:खभरली शायरी माझी मला भलतीच प्यारी

- निलेश पंडित
३ जानेवारी २०१६

बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

शल्य


तू शिकवलंस
मीही शिकलो
नकळत सारं
जन्मभरासाठी
जगण्याचं जपण्याचं
कौशल्य
पण दिलंस एक शल्य
काल भेटून जाता जाता

शमवताना
सहन करावी
मुकी वेदना मूकपणानं
जशी दिलीस तू
शांतपणे
अशा वेळी
जेव्हा तुझ्या तोंडून
कधीच न आलेल्या
शब्दांची मी वाट
चातकासारखी पाहिली
व्यर्थच

.... आणि माझी वेदना
शमून लोटलेल्या तपानंतर
भेटून जाताना
कडा तुझ्या डोळ्यांच्या
पाहिल्या झालेल्या ओलसर
तेव्हा कळलं
वेदना
शमवताच नव्हे
येते जपताही


- निलेश पंडित
१७ डिसेंबर २०१५

शनिवार, २० जून, २०१५

राहून गेले


(वृत्त: व्योमगंगा)

शब्द माझे संपले पण बोलणे राहून गेले
भेटले डोळे तरी ओलावणे राहून गेले

स्वप्न वेडे पाहिले होतेस तू ते जाणले मी
नेमक्या वेळी तुला मी सांगणे राहून गेले

देह देहा सावलीला सावली कवळून गेली
मन मनाशी मात्र तेव्हा जोडणे राहून गेले

भाळलो मी भाळली होतीस तूही कैक वर्षे
आपले ते भाळणे सांभाळणे राहून गेले

घेउनी हातात आपण हात दोघे चालताना
फक्त मुक्कामास अंती पोचणे राहून गेले

- निलेश पंडित
२१ जून २०१५

रविवार, ३१ मे, २०१५

ठहराव

(वृत्त: व्योमगंगा)

तोच मी अन् तेच माझे नाव आहे गाव आहे
धावत्या जगण्यात आता का असा ठहराव आहे

वाचली मी सर्व पाने शेवटाची फक्त उरली
आज पहिली वाचण्याचा का तुझा प्रस्ताव आहे

वेदना मृत्यूत असते नेहमी ऐकून होतो
त्याहुनी जगण्यात मोठी हा कुणाचा डाव आहे

तू तुझ्या ओठांतली डोळ्यांतली नेलीस शस्त्रे
आजही माझ्या मनावर तू दिलेला घाव आहे

श्वास जाणवती तुझे जर आजही श्वासांत माझ्या
तर मला स्वप्नातही येण्यास का मज्जाव आहे

- निलेश पंडित
१ जून २०१५

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

जाता जाता

ते जुने सगळेच आता माग जाता जाता
लावली आहेस वेडे आग जाता जाता

हासते अन् लाजते का हे मला समजेना
व्यक्त करताना तिचा ती राग जाता जाता

माळते ती फूल साधे मी दिलेले जेव्हा
फुलवते स्वप्नात माझ्या बाग जाता जाता

ही नव्हे तक्रार जाते देउनी चटका ती
ठेवते ती अटळ मोठा डाग जाता जाता

का पुढे गेलीस दृष्टी क्षीण झाली माझी
मी कसा काढू ठशांचा माग जाता जाता

रात्र येते मग जरा रेंगाळते अन् जाते
फक्त ह्याचा राग ... देते जाग जाता जाता


- निलेश पंडित
४ एप्रिल २०१५

सोमवार, २३ मार्च, २०१५

उसासा

(आल्फ्रेड ऑस्टिन यांच्या A fragment ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद)

फिरणारा केसांत तुझ्या तो शुभ्र पांढ-या
थरथरणारा हातही प्रिये नसेल जेव्हा
मी नसताना
धुंद नशेतच तुझ्या रुपाच्या क्षीण ध्वनीही
असेल विरला अखेर माझा माझ्या मागे
तू असताना

स्मृतीत माझ्या तेव्हा एकच सोड उसासा
ऐकावा जो अन् मी यावे राखेमधुनी
तुझ्याचसाठी
पुन्हा एकदा बांधाव्या मी मुग्ध मनाने
तुझ्या रुपाने धुंद होउनी शब्द्फुलांच्या
रेशिमगाठी

भले त्वचेवर लक्ष सुरकुत्या, केस पांढरे
वार्धक्याची अतीव थरथर …. छबी असू दे
हीच रुपाची
माझ्याविण तू तुझ्याविना मी एक स्थिती ही
जिच्यात नांदे नित्य निरंतर ऊब आगळी
संकल्पाची

दोन जिवांना काळाने वेगळे करावे
परी अनामिक शाश्वत नाते त्यांत उरावे
योग हा असा
करील जीवित पुनश्च मजला ...  पुन्हापुन्हाही
… राख भरवसा - करील यौवन बहाल तुजला
तोच उसासा


- निलेश पंडित
२४ मार्च २०१५

मूळ कविता:

A Fragment

Should fickle hands in far-off days
No longer stroke thy hair,
And lips that once were proud to praise
Forget to call thee fair,
Sigh but my name, and though I be
Mute in the churchyard mould,
I will arise and come to thee,
And worship as of old.

And should I meet the wrinkled brow,
Or find the silver tress,
What were't to me, it would be thou,
I could not love thee less.
'Gainst love time wages bootless strife,
What now is would be then;
The cry that brought me back to life
Would make thee young again


- Alfred Austin

सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

रस्ता


भरकटावे नेमके मी का असा चुकवून रस्ता
त्यातही तो मीच आधी नेहमी बनवून रस्ता

दूर मी गेलो तिच्यापासून नकळत खूप वर्षे
चाललो मी थांबली पण ती मला सुचवून रस्ता

एकमेका शोधताना दूरवर आलो तरीही
भेटलो नाही कसे ... चुकलो कसे ... ठरवून रस्ता

रोषणाई आपल्या कित्येक स्वप्नांची दुतर्फा
भव्य माझी अंत्ययात्रा शेवटी सजवून रस्ता

चाललो मी आणि रस्ता सरळ होता हेच चुकले
साधते लोकांस सारे नेहमी वळवून रस्ता

'पंडिता'ला एकटा सोडून ती गेली सुखाने
आठवण पण आजही असते तिची अडवून रस्ता

- निलेश पंडित
२२ डिसेंबर २०१४

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

निष्फळ


जरी पूर्णपणे नव्हे
तरी जवळपास
एक होत जातो आम्ही दोघे
मी आणि एक कुणी
संतत कायम त्यात एक मी
आणि कुणी इतर
मला त्या प्रसंगातून
आयुष्याशी एकजीव करणारा
किंवा करणारी

कधी तळयापाशी एकांतात
माझ्या प्रतिबिंबाशी लगट करणारी
आकाशाची खोल अद्भुत निळाई
कधी गूढ संध्यासमयी
माझ्या रोमारोमात संचारलेला
मारव्याचा कोमल ऋषभ
कधी गालावर ओघळणाऱ्या
अश्रूइतकाच तप्त
अन्ननलिकेतून सुखद ज्वलनाने
झिरपत जाणारा
सिंगल माल्ट व्हिस्कीचा जिवंत घोट
- तर कधी हे सगळेच निष्प्रभ ठरल्यावर
माझ्या साथीला अखेरीस उरणारा मीच

कुणा ना कुणाबरोबर मी
किंवा अखेरीस कधी
मी आणिक मी
असे आम्ही दोघे

करत बसतो - करत बसू
निष्फळ प्रयत्न
काही क्षण तरी बनण्याचा
आपण दोघे
मी आहे तोपर्यंत


- निलेश पंडित
२९ नोव्हेंबर २०१४

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

दोष

(वृत्त: उद्धव)

ओघळले अश्रू काही
हातातुन सुटला हात
खिळले वाटेवर डोळे
उरलेल्या अंधारात

दुसऱ्या हातात चिमुकले
धन तुझेच आहे धरले
ज्या आधाराने माझे
जग आहे मी सावरले

मी तमातही आताशा
एकाकी सावध असते
साधेपण कुरूपतेला
हृदयाशी धरून वसते

सामाजिक कवचापाशी
अडतात बरसते घाव
कौटुंबिक कुंपण रोखे
ओंगळ सर्पांची धाव

पण आहे वणवा एक
अंतर्यामी माझ्याही
तो शमवावा विझवावा
हे माझ्या नशिबी नाही

ह्या अस्थिरतेतच माझ्या
जर कुठे घसरला पाय
मी मलाच सावरताना
तो दोष कुणाचा … काय … ?

- निलेश पंडित
१२ नोव्हेंबर २०१४

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

लाटा

(वृत्त: व्योमगंगा)

शांतता पाहून काठावर पुन्हा येतात लाटा
वादळे ठेवून मागे का परत जातात लाटा

तू अशी लाजून हसता चवबिचल होते जिवाची
शांत सागर भासतो पण आत खळबळतात लाटा

शांत सात्विक चेह-यामागे तुझे मन दडत असते
उष्ण श्वासातून पण ह्रदयातल्या कळतात लाटा

शांतसा असतो किनारा आणि असतो एकटा मी
फक्त डोळ्यातून ओहोटीतही झरतात लाटा

भिजवती तळव्यांस माझ्या आणि अडखळती जराशा
वाट बघताना तुझी पायात घुटमळतात लाटा

हेलकावे देत आल्या नेहमी भिजवून गेल्या
कोरड्या स्थैर्यात आता रोज त्या स्मरतात लाटा

गलबते होड्या परतती सूर्यही अस्तास जातो
संगतीला सांजवेळी नेहमी उरतात लाटा

- निलेश पंडित
२ नोव्हेंबर २०१४

शुक्रवार, १८ जुलै, २०१४

औषध


कळ मुळातूनच नाहीशी करणारा
मलमाहून मुलायम स्पर्श
प्रकृतीची हेळसांड करणाऱ्या
बेफिकीरीवर आळा घालणारा
काढ्याहून कडवट स्वर
जखमेवर पट्टीची
गरजच न वाटावी
अशी फुंकर

हे सगळंच नाहीसं होऊन
जेव्हा उरली
न संपणारी
फक्त बधीर करून
जिवंत सोडणारी
चिरवेदना
तेव्हापासून मी शोधतोय
औषध
अशा सर्व औषधांवर
जी ठेवतात
मला सशक्त … सुदृढ
आणि
येऊ देत नाहीत माझ्यापर्यंत
माझ्या अंतिम जिव्हाळ्याच्या मित्राची चाहूल
औषधालासुद्धा


- निलेश पंडित
१९ जुलै २०१४

शनिवार, १२ जुलै, २०१४

सरी


(वृत्त: आनंदकंद)

आल्या सरी स्मृतींच्या आयुष्य वेचताना
भांबावलो जरा तो पाऊस झेलताना

दुष्काळ फक्त आला नशिबात नित्य माझ्या
धास्तावतो अताशा आनंद पेरताना

तो काळ मुद्दलाचे देऊन स्वप्न गेला
व्याकूळ आज होतो मी कर्ज फेडताना

देतेस तूच शक्ती नसलीस तू तरीही
ओझे जुन्या क्षणांचे आजन्म पेलताना

खेळून काळ गेला गेलीस त्यासवे तू
मोहात जीर्ण उरलो मी खेळ खेळताना

आहे अजून जागा होती तशी रिकामी
दोघांस मोजल्याने आयुष्य बेतताना


- निलेश पंडित
१२ जुलै २०१४

शुक्रवार, २० जून, २०१४

उणे


(वृत्त: व्योमगंगा)

भेटलो मनसोक्त पण काही उणे राहून गेले
मनसुबे माझे खरे मी सांगणे राहून गेले

राग तालाची मिळाली जोड उत्तम बंदिशीला
मात्र माझे सूर काही लागणे राहून गेले

वेदनेचा अस्त झाला सर्व गात्रे क्षीण झाली
अडकलेले प्राण केवळ सोडणे राहून गेले

पाहिली सारी सुखे अन् भोगले ऐश्वर्य सारे
एकट्याने भोगले ते वाटणे राहून गेले

पुण्यवंतांच्या कृतींचे गोडवे मी गात गेलो
पुण्य आणिक पाप माझे मोजणे राहून गेले

'पंडिता'चे राहुनी गेले कसे अन् काय, कोठे
मोजताना मिळविलेले भोगणे राहून गेले


- निलेश पंडित
२१ जून २०१४

शुक्रवार, ९ मे, २०१४

मनीषा


अजूनही आठवतं
शेवरीच्या
मऊसुत … मुलायम
कापसासारख्या
ढगांमध्ये वसलेलं
आपलं
स्वप्नातलं
घरकुल …
त्या घरकुलाभोवती
तरंगणारे स्वप्नांचे ढग …
ते भेदून टाकणाऱ्या
खऱ्याखुऱ्या
दगडी राजवाड्याच्या
उंच मनोऱ्यांच्या
तळाशी वसलेलं
खरंखुरं जग …
जिथे संपली सगळी स्वप्नं
जेव्हा गेलीस तू कायमची
त्या जगात
दिमाखात
जगण्यासाठी
तुझ्याबरोबर घेऊन
साऱ्या आशा
माझ्या मनात शिल्लक ठेवून
एकच मनीषा …

जगण्यात स्वप्नं उरण्यापेक्षा
विरलेल्या स्वप्नांत जगणं बरं
हे तुला न कळो
… कधीही …


- निलेश पंडित
९ एप्रिल २०१४

रविवार, ४ मे, २०१४

खुणा


(वृत्त: कलिंदनंदिनी)

कुठेतरी उगाच मी खळी सुरेख पाहतो
मनात भूतकाळ त्या खळी मधून वाहतो

कधी सुरेल गीत ऐकताच जीव हो पिसा
स्मृतींमधून वर्तमान सावरी कसाबसा

कधी सुगंध मंद धुंद रोम रोम ग्रासतो
पुनश्च एकवार काळ स्वप्नदूत भासतो

अबोल, शांत बाह्यतेत … घालमेल अंतरी
असा कसा जगू सदैव खिन्न मी अधांतरी?

तिच्याविना तिच्यासवे कशास व्यर्थ धावणे?
मनातल्या मनात अन् पुन्हा तिला दुरावणे!

परी विचार येतसे नकोच एकटेपणा
उदंड साथ देत ह्या स्मृतीतल्या तिच्या खुणा!


- निलेश पंडित
४ मे २०१४