हा ब्लॉग शोधा

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१२

थोडे चुकले


उदात्त तत्वे नकळत आम्ही जरा बदलली...थोडे चुकले
"विचार साधे - उच्च राहणी" अंगिकारली...थोडे चुकले

"देशासाठी रक्त सांडणे...कर्तव्यच हे नागरिकांचे"
म्हणून आम्ही जी मिळेल ती मान कापली...थोडे चुकले

संत म्हणाले, "मनुष्य जन्मी सार्थक व्हावे नरदेहाचे !"
हरेक स्त्री मग अमुच्या लेखी मादी ठरली...थोडे चुकले

"देवळात ना देव....पहावा माणसात तो"...कुठे वाचले
अम्हीच झालो बुवा नि थैली यथेच्छ भरली...थोडे चुकले

"गायन वादन नर्तन अपुली थोर संस्कृती"...म्हणत तारका
आपखुषीने विवस्त्र होता सभा लाजली...थोडे चुकले

थोडे चुकले...थोडे चुकले...म्हणता म्हणता गहजब झाला
जिथे बाळसे होते तेथे सूज पसरली...थोडे चुकले

- निलेश पंडित
१८ नोव्हेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा