हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

मचूळ

(वृत्त: अनलज्वाला)

कात टाकुनी जरी नव्याने अवतरतो मी
पापुद्र्यांचे मचूळ जीवन का जगतो मी?

वृथा कल्पनाविलास आणिक अतर्क्य उपमा
तर्क शक्य पण त्याला भीतीची परिसीमा
शुष्क त्वचेवर नित्य लावतो आर्द्र मुलामा
वेध कुणी हृदयाचा घेता बावरतो मी
पापुद्र्यांचे मचूळ जीवन का जगतो मी?

अनपेक्षित माणुसकी मजला देते गहिवर
शौर्याच्या गाथाही गातो मी अजरामर
अंतरातला मानव सांभाळतो निरंतर
परंतु बाका प्रसंग येता अवघडतो मी
पापुद्र्यांचे मचूळ जीवन का जगतो मी?

अस्थी मज्जा रक्ता मांसाच्या या देही
जाणवतो पण का मलाच मी उमगत नाही?
मुक्त मनाने विहरू बघतो दिशांत दाही
जमिनीवर पण तोल राखण्या धडपडतो मी
पापुद्र्यांचे मचूळ जीवन का जगतो मी?

पिढ्यांमागुनी पिढ्या अशा या विटा रचाव्या
वैश्विक आनंदाच्या ओव्या सदैव गाव्या
ढोबळ पण प्रगतीच्या वाटा त्यांत वसाव्या
दैनंदिन या आशेवर कंबर कसतो मी
म्हणून बहुधा या पापुद्र्यांना जपतो मी!



- निलेश पंडित
१७ सप्टेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा