हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २ जानेवारी, २०१४

वृत्तबद्धता आणि वादविवाद


(लेखातील सर्व मते केवळ माझी असून ती कदाचित काहींना पटणार नाहीत.)

सध्या काव्याशी संबंधित जवळपास प्रत्येक चर्चामंचात कवितेच्या वृत्तांचा विषय निघाला की 'वृत्तबद्धतेची किंवा छंदोबद्धतेची आता गरज उरलेली नाही' असा विचार अनेक जण मांडताना दिसतात. असा विचार मांडताना त्यांच्या मनात बहुतांशाने सहजते चं महत्त्व सर्वांत जास्त असतं. मला हा विचार काहीसा मर्यादित आणि त्रोटक वाटतो. कारण सहजता हा काव्याचा काही वेळा भावणारा गुण असला तरी तो अनेक पैलूंपैकी केवळ एक पैलू आहे, तसंच तो प्रत्येक उत्तम कवितेस लागू पडेल व पडावा असंही नाही.

साकल्याने विचार करताना मला खालील मुद्दे महत्वाचे वाटतात. (ते प्रश्नोत्तरांच्या किंवा चर्चेच्या स्वरुपात मांडणं अधिक सोयीस्कर वाटल्याने मी तसे मांडलेले आहेत.)

१) काव्य सहज, स्पष्ट आणि सोपं असावं:
काव्य समजायला कमी अधिक सोपं किंवा स्पष्ट असू शकतं. गहनता किंवा गूढता आणि सुस्पष्टता हे दोन्ही - परस्पर विरोधी असलेले - गुण काव्यात असू शकतात. अनेक पौराणिक तसंच सद्यकालीन महाकाव्यं अत्यंत गूढ आणि गहन असून निरनिराळे वाचक त्यांचा निरनिराळा अर्थ लावतात. पण गहनतेमुळे त्या काव्यातलं काव्य म्हणून मूल्य कमी होत नाही. याउलट बोरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके यांसारख्या थोर कवी - कवयित्रींच्या अनेक कविता समजण्यास अतिशय सोप्या आहेत. या सोपेपणा मुळेदेखील त्या कवितांमधील काव्य मूल्य कमी होत नाही. (याच तिघांच्या अत्यंत गूढ आणि गहन कविता देखील आढळतात. त्याही तितक्याच उत्कृष्ट आहेत.)
हा पैलू वृत्तबद्धतेच्या संदर्भात "वृत्तबद्ध म्हणजे समजण्यास कठीण" अशा पूर्वग्रहाने मांडला जातो. परंतु प्रत्यक्षात वृत्तबद्धतेचा वाचकासाठी स्पष्टपणा (clarity) किंवा सोपेपणा (ease) यांच्याशी फारसा संबंध नाही. अनेक उत्कृष्ट मुक्तछंदही गहन असू शकतात, असतात.

२) बहिणाबाईं सारखी निरक्षर स्त्री इतकं उत्तुंग काव्य करू शकते तर आपण वृत्तांचा आग्रह का धरावा?
- (मुळात निरक्षर असलेल्या बहिणा बाईंनी केलेलं काव्य हे निसर्गतःच त्यांच्या अंगी असलेल्या लयीचा उत्तम वापर करून केलेलं असल्यामुळे ते बऱ्याच अंशी अक्षरछंदातच आहे.) बहिणाबाईंची प्रतिभा, किशोरकुमारची शास्त्रीय संगीताच्या तालमीविनाही मुळातच असलेली गाण्याची जाण आणि अशी इतर कलांमधली अचंबा वाटावा अशी नतमस्तक करणारी उदाहरणं ही अपवादात्मक आहेत, सार्वत्रिक नाहीत हे कुणीही मान्य करेल. इथे एक उपमा प्रकर्षाने मांडावीशी वाटते - एखाद्या रेताड जमिनीत एखादं फळझाड बहरून येतं आणि चमत्कारिक रित्या रसाळ फळं देऊ लागतं, म्हणून ती लागवडीची शास्त्रोक्त पद्धत ठरत नाही. तसंच बहिणाबाईं सारखी किंवा किशोरकुमार सारखी अपवादात्मक उदाहरणं ही सार्वत्रिक प्रशिक्षणाची किंवा सर्व सामान्यांच्या साधनेची दिशा ठरवण्यासाठी वापरता येणार नाहीत - ती फार फार तर स्फूर्ती स्थानं ठरू शकतील. (असं नसतं तर आपल्याला प्रशिक्षणाने महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो बहिणाबाई घडवता आल्या असत्या!)
या प्रश्नाच्या अनुषंगाने अजून एक पैलू महत्वाचा ठरतो. बहिणाबाई काय आणि किशोर कुमार काय - निसर्गतः समजू शकणार नाहीत अशी अनाकलनीय, पण आनंददायक, मात्र ठरवून घडवता येणार नाहीत अशी ही उदाहरणं त्या त्या कलेसाठी सर्वव्यापी मानणं ही देखील चूकच ठरेल. बहिणाबाईंची शैली "अरे संसार संसार" किंवा "मन वढाय वढाय" ला जितकी साजेशी आहे तितकी ती "श्रावणमासी हर्ष मानसी" किंवा "श्रावणात घननिळा बरसला" सारख्या आशया-विषयांस योग्य ठरेल असं नाही. त्याच धर्तीवर किशोर कुमार ची गायकी अभंग-शास्त्रीय साच्यांना तितकीच साजेशी वाटेल असं नाही. या प्रत्येक साच्यास आपापलं महत्व आहे आणि एकामुळे दुसऱ्याची गरज राहिली नाही हा दृष्टीकोण उथळ ठरेल. ज्यांना कलेचा पद्धतशीर - प्रशिक्षणात्मक वा काटेकोर पद्धतीने विकास करायचा आहे त्यांनी अशा महान कलाकारांचा आदर राखून तंत्रशुद्ध मार्गांचाही अवलंब करावा हे उचित नव्हे काय? मराठीतील अनेक उत्कृष्ट कवींनी वृत्त / छंद या बरोबरच मुक्तछंदही लिहिले. प्रत्येकाने सर्वच प्रकार चोखाळावेत असा आग्रह जरी योग्य नसला तरी सर्व प्रकारांचा प्राथमिक अभ्यास करणं आणि आदरही ठेवणं यात मला औचित्य वाटतं.
मुळात निसर्गतः मनुष्याला जी लयीची, सौंदर्याची जाणीव आहे ती पूर्णच आहे आणि कष्टातून वा साधनेतून फारसा फरक पडत नाही, फरक पाडण्याची गरजही नाही हा भावच व्यक्तीशः मला त्रोटक वाटतो. साधनेचं, काटेकोर अभ्यासाचं महत्व अनन्य साधारण आहे आणि ते असंख्य उदाहरणांमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे काव्यात वृत्त, आशय, भाव, विविधता, शब्दसौंदर्य, आकृतिबंध या आणि अशा प्रत्येक पैलूला साधनेने अधिक तासून, चमकवून सुधारण्यास अमर्याद वाव आहे हा विश्वास मला कवी तसंच वाचकासाठी देखील अधिक उचित वाटतो.

३) वृत्त बद्ध काव्या साठी लागणारी तयारी, अभ्यास नसल्यास तसंच माहिती, शब्दसंग्रह नसल्यास कविता करूच नयेत का? चारोळी किंवा तत्सम साधे-सोपे काव्यप्रकार म्हणजे काव्य नव्हे का?
- असं अजिबात नाही. मुक्त किंवा स्वैर काव्य - म्हणजेच वृत्त-छंदात नसलेलं काव्य अनेकदा उत्कृष्ट असतं. या प्रत्येक प्रकाराला विशिष्ट महत्त्व आहे आणि ते महत्त्व त्या त्या उपयोगासाठी निश्चित आहे. फक्त "वृत्तबद्धच लिहावं" हा आग्रह जसा अनाठायी भासतो, नेमका तसाच "वृत्ताची आता गरजच उरली नाही … आता बोरकर, कुसुमाग्रज, शेळके यांचा जमाना गेला" हा दावाही संकुचित व अनाठायी वाटतो.
शिवाय जसं सुगम संगीताचे गायक देखील शास्त्रीय संगीताचा अभ्यास "पूरक" म्हणून करतात तसा वृत्तांचा अभ्यास असावा.

अर्थात हा प्रश्न वाचकालाही तितकाच लागू पडतो. संगीत, चित्रकला या कलांप्रमाणेच काव्य या कलेतही कलाकाराच्या अभ्यासा इतकी नव्हे पण वाचकाची (आस्वादकाची) जाण देखील महत्वाची ठरते. म्हणूनच "सहज, प्रत्येकाला पट्कन समजेल अशी कविता असावी" हा काही जणांचा आग्रह क्षणभर त्यांच्या पुरता ठीक वाटला तरी ते लिखाणाचं किंवा वाचनाचं सूत्र ठरवणं ही मोठी चूक ठरेल.

४) मुक्तछंद किंवा स्वैर काव्य वृत्तबद्ध काव्यापेक्षा अधिक परिणामकारक असू शकत नाही का?
- असं काही नाही. असा नियम करता येणार नाही. कित्येक विषय, कित्येक भाव मुक्तछंदात अतिशय खुलून दिसतात. विशेषतः इंग्रजी, हिंदी किंवा एकूणच इतर भाषांमधील शब्दांचा वापर आणि पाश्चात्य पार्श्वभूमीवर आधारलेला आशय मुक्तछंदात जितका खुलतो तितका तो वृत्तबद्ध कवितेत खुलतोच असं नाही. त्याच बरोबर हे ही खरं की जी काव्यं वृत्तात खुलतात ती तशीच मुक्तछंदात खुलत नाहीत.

यात महत्त्वाचा मुद्दा हा की अनेकदा जोपर्यंत आपण मुक्तछंदातला आशय वृत्तात कसोशीने बांधून पहात नाही तोपर्यंत मुक्तछंदाचा साधेपणा व सहजता आकर्षक वाटतात. असा प्रयोग केल्यानंतर मात्र अनेकदा वृत्तबद्धता अधिक डौलदार वाटते.
"म्यानातून काढून
वेडात तरवार
धावले
सात मराठे सरदार"

यांत तो डौल नाही जो
"म्यानातुन उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सांत"

.... या भूपतीत बांधलेल्या ओळींमध्ये आहे.

कुणीसं पावसात आलं
विचारलं मला,
"ओळखलंत का सर?"
कपड्यांवर चिखल
पाणी होतं
केसांवर

यामध्ये आता तो दम आढळत नाही जो "कणा" च्या सुरुवातीच्या दोन ओळींमध्ये आहे. "कणा" तशी ढोबळ लयीतली कविता आहे - अचूक वृत्तातली नव्हे, पण केवळ अंगभूत लय असल्यामुळे त्या कवितेला असामान्य सौंदर्य प्राप्त झालं आहे हे मला वाटतं कुणीही अमान्य करणार नाही.
महत्वाची बाब ही की वृत्तबद्धता आणि लय असणं - नसणं आणि त्यांचा काव्यावर होणारा परिणाम तसंच काव्यगुणांची निर्मिती आणि अभाव हे "हो- नाही" इतके स्पष्ट विरोधाभास नसून त्यांच्या कमी अधिक छटा व श्रेणी असू शकतात. त्यानुसार वृत्तबद्धतेचा किंवा छंदोबद्धतेचा कमी अधिक वापर केला जाऊ शकतो.

५) वृत्तबद्धतेचे वा छंदोबद्धतेचे फायदे काय?
वृत्तबद्धतेचे वा छंदोबद्धतेचे चार प्रमुख फायदे अनुभवांती मला जाणवतात:
१) गेयता; २) चिंतनास दिशा; ३) आकृतीबंधाचं अंगभूत सौंदर्य; ४) भाषाप्रभुत्वाचा विकास किंवा भाषासमृद्धीत वाढ;
१) गेयता: वृत्तबद्धता किंवा छंदोबद्धता गेयता निर्माण करते. प्रामुख्याने ताल. ऱ्हस्व दीर्घांची ओढाताण करून काही गाणी जरी लयीत बसवली गेलेली असली तरी तालाचा नेमकेपणा वृत्तबद्धते तून जपला जातो हे उघड आहे. अगदी निव्वळ छंदोबद्धता गेयतेस मदतकारकच ठरते हे "अरे संसार संसार" किंवा "काही बोलायाचे आहे" अशा अष्टाक्षरींवरून सिद्ध होतं.
(या मुद्द्यावर अनेकदा "मेरा कुछ सामान" किंवा तत्सम गाण्यात उत्तम बसवलेल्या एखाद्या मुक्तछंदाचं उदाहरण दिलं जातं. हे देखील एक अपवादात्मक उदाहरण आहे. असा अपवाद स्फूर्तीदायक असला तरी तो नियमच काय पण संकेतही ठरू शकत नाही. अपवादातून प्रशिक्षणाची अथवा साधनेची दिशा निर्माण होत नाही यावर दुमत नसावं असं मला वाटतं.)
२) चिंतनास दिशा: वृत्तबद्धतेचा हा फायदा बहुधा चर्चेत येत नाही. श्री. ना. सी. फडक्यांनी एके ठिकाणी लिहिल्या प्रमाणे अवलोकन आणि अनुभूती हे साहित्यरथाचे दोन अश्व आहेत. त्यामुळे …
अवलोकन वा अनुभूतीतून चिंतन - चिंतनातून आशयनिर्मिती - आशयातून काव्यनिर्मिती आणि आकृतीबंधाची निर्मिती …
अशी कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया सर्व साधारणतः सर्वांना अभिप्रेत असते - जी योग्य ही आहे. पण वृत्तात म्हणजे लयीत लिहिण्याचा प्रयत्न कधी कधी चिंतनास म्हणजे ओघानेच आशयास नवीन दिशा देतो. गझल लिहिताना तर हा अनुभव वारंवार येतो. वृत्त आणि रदीफ ठरल्यानंतर - मला खात्री आहे, माझ्या सारखा प्राथमिक गझला लिहिणारा कवी देखील ठरलेल्या वृत्तात बसणाऱ्या काफियांचा विचार कळत नकळत करतो. लयीत विचार म्हणजेच ओघाने उला आणि सानी मिसरा जुळवू लागतो - त्यात नाविन्य पेरण्याचा विचार करतो आणि त्यातून आशय निर्मिती होते. म्हणजेच सुप्त (subconscious) असलेल्या अनुभवाला अथवा अवलोकनाला जागृतावस्थेतील विचारांच्या पातळीवर आणून कवितेत अभिव्यक्त करण्याच्या क्रियेस वृत्तबद्धता कारक ठरते.
३) आकृतीबंधाचं सौंदर्य: हा पैलू अगदी साधा, सरळ, सोपा आहे. प्रत्येक आकृतीबंधाला (मुक्तछंदालाही) स्वतःचं अंगभूत सौंदर्य असतं. उदाहरणार्थ मंगलाष्टकं शार्दूल विक्रीडितातच (रूढ झाल्यामुळे कदाचित) उत्तम भासतात. मनाचे श्लोक भुजंग प्रयातात आणि करुणाष्टकं "मालिनी"तच छान वाटतात. सर्वांनाच असं वाटेल असं नाही, पण बहुतेक वाचकांना आजही या आकृतीबंधांच्या सौंदर्याची अनुभूती येते.
४) शब्दसंग्रहात आणि भाषा समृद्धीत वाढ: हा पैलू देखील स्पष्ट व सोपा आहे. लयीत बसेल अशा शब्दांचा विचार करण्याच्या प्रयत्नात अधिक शब्द शोधले, स्वीकारले, समजून घेतले व वापरले जातात.

६) वृत्तबद्धता कमी होत चालली आहे. मुक्तछंद व स्वैर लिखाण वाढतंय. हे वृत्तबद्धता कालबाह्य होत चालल्याचं लक्षण नाही का?
- शक्य आहे. सुनीत जसं कालबाह्य होत गेलं आणि आजही पूर्ण पणे कालबाह्य झालेलं नसलं तरी सुनीत या आकृती बंधाचा वापर कमी झालेला आहे, तसंच वृत्तबद्धतेच्या बाबतीत येत्या काही दशकांत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच विचार करायचा झाल्यास अख्खी मराठी भाषाच कदाचित भाषा म्हणून कालबाह्य होत जाऊन एक कमी महत्वाची बोली बनून राहील असा संशय देखील वावगा ठरणार नाही. स्टुडिओत जाऊन गाणंही कालबाह्य होत जाईल कदाचित. आणि नेमकी कोणती गोष्ट कधी आणि किती वेगाने कालबाह्य होईल हे सांगणं कलेच्या क्षेत्रात कठीण आहे. धकाधकीच्या आयुष्यात कलाकाराला किंवा आस्वादकाला मिळणारा वेळच कमी होत गेल्याने हे होणं स्वाभाविक आहे. पण त्यामुळे मूळ कलेच्या सौंदर्याबद्दल शंका घेणं योग्य नाही असं मला वाटतं.
कालबाहयते च्या शक्यतेमुळे किंवा तत्सम धोक्यामुळे कशाचा वापर करावा वा त्याग करावा हा निर्णय अर्थातच प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे.

७) अनुभव: या बाबतीत मला वाटतं बहुतेक वेळा वृत्तबद्ध न लिहिणाऱ्या किंवा वाचणाऱ्यांची वक्तव्यं हमखास ऐकायला वाचायला मिळतात. मला वाटतं, आधी वृत्तबद्ध न लिहिणाऱ्या परंतु शिकून नंतर लिहू लागलेल्या कवी / कवयित्रींचा अनुभव तसंच आधी मुक्तछंद न लिहिणाऱ्या व फक्त वृत्तबद्ध लिहिणाऱ्या कवी / कवयित्रींचा अनुभव जाणून घेणं या विषयाच्या सर्वांगीण उहापोहासाठी सर्वांत महत्वाचं ठरेल. व्यक्तीशः मला मी एके काळी वृत्त बद्ध लिहित नव्हतो तेव्हा माझ्या कवितेची व्याप्ती निश्चितच कमी होती असं मनापासून वाटतं.

८) वृत्तबद्ध लिहिणारे मुक्तछंद लिहिणाऱ्या कवींना तुच्छ लेखतात - असं का?
वृत्तबद्ध लिहिणारे मुक्तछंद लिहिणाऱ्यांना किंवा मुक्तछंद लिहिणारे वृत्तबद्ध लिहिणाऱ्यांना तुच्छ लेखतात असं सार्वत्रिकीकरण करणारं विधान धाडसाचं ठरेल आणि तो वैयक्तिक दोष ठरेल - कारण ते चूकच. परंतु "वृत्तबद्धच लिहावं - मुक्तछंद ही कविताच नव्हे" तसंच "वृत्तबद्धतेची समर्थ अभिव्यक्तीस गरजच नाही - स्वैर आणि मुक्त लिहिणं पुरेसं आहे" या दोन्ही भूमिका मला तितक्याच टोकाच्या आणि त्याज्य वाटतात. याची कारण मीमांसा या लेखात यापूर्वी मी दिलेली आहेच.

शेवटी एक गमतीशीर बाब नमूद करावीशी वाटते. अनेक मुक्त / स्वैर लिहिणारे कवी वाचताना नकळत लयीत व यमकाला शक्य तितका न्याय देत त्यांच्या कविता वाचतात. जर ही सहज प्रवृत्ती आहेच तर ती घासून पुसून शक्य तेव्हा आणि शक्य तेवढी योग्य अभ्यासाने आणि सरावाने वृत्तात का बांधू नये?

- निलेश पंडित
३ जानेवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा