हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १ मे, २०१४

सुख

(वृत्त: अनलज्वाला)

काल वादळे पाझरली डोळ्यांतुन काही
बरेच सरले मी ही माझा उरलो नाही

काही तीक्ष्ण नि काही बोथट स्पर्शुन गेले
ऊबेचे - आधाराचेही पाट वाहिले

कुरूपता अन् सुरूपता माझीही दिसली
हरल्याची पण सावरल्याची खूण गवसली

अगतिकतेने प्रवास झाला कालप्रवाही
अस्तित्वाच्या नशेत देहमनाची लाही

असो कसेही जे झाले ते बरेच झाले
दोनच क्षण पण मन उर्जेने सचैल न्हाले

क्षणात खिळले अन् मिटले जे डोळे ओले
कधी न सांगितलेले सारे सांगुन गेले

तो तसाच हा - दोन्ही अवघड वियोग होते
जुळण्याआधी तोडत गेले अगम्य नाते

विचारात एकाच मात्र ह्या सुखावतो मी
निश्चित आता भेटू अखेरच्या मुक्कामी


- निलेश पंडित
१ मे २०१४

२ टिप्पण्या: