(एका चर्चेत माझ्या स्नेही डॉ. उत्तरा चौसाळकर ह्यांनी एक छान सुटसुटीत संकल्पना दिली व त्यावर कविता कशी लिहिली जाऊ शकेल ह्यावर आम्ही चर्चा करत राहिलो. त्या चर्चेतून लिहिली गेलेली कविता.)
कसे लिहू ते
पत्र तुला मी
जे लिहिताना
उरेल काही
जे उरल्यावर
तुला पत्र ते
मी पाठवणे
शक्यच नाही!
भले जरी मी
लिहिले सारे
सुप्त मनाचे
गूज रेशमी
तसेच आणिक
पाठवले तर
राहू नंतर
कशी स्वस्थ मी?
शरीरतेच्या
दोन पायऱ्या
ओलांडुन ह्या
खरेच काही
नुरेल का रे?
वाचुन तुजला
समजतील का
माझ्या आतिल
… खोल मनातिल …
तारे … वारे?
सल तो माझा
उरेल केवळ
माझ्यापाशी
होय … कदाचित
कायमचाही
ना लिहिता … ना
पाठवता जो
तनामनाला
तसा नेहमी
जाळत राही
एकच केवळ
मात्र जाणते
मी माझ्यातच
जळते आहे
तुला कळो वा
कधी न समजो
तुझे स्थान मज
कळते आहे
- निलेश पंडित
२४ नोव्हेंबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा