हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १० मे, २०१८

सोपस्कार

कालपरवा वाटला आम्हास जो व्यभिचार होता
त्यातही निर्भेळ नाजुक कोवळा आकार होता

टिकवतो वा तोडतो लिव्ह इन रिलेशनशिप सुखाने
छान बाहेरून लग्ने आत हाहाकार होता

आपल्या प्रत्येक शिष्येशी म्हणे संबंध होते
मानवी देहातला तो दिव्य आविष्कार होता

शांत मुद्रा स्वच्छ भाषा सर्व काही छान होते
खूप खोटे बोलण्याचा पण जुना आजार होता

निरनिराळया दोन जोड्या दोन जागा चार शरिरे
पण इथे संसार होता अन् तिथे व्यवहार होता

रुंद रस्ते शांत बागा कारखाने आणि खाणी
मात्र मागे झोपड्यांचा वाढता विस्तार होता

बंद डोळे पाहती उत्कट क्षणी दुसरेच काही
लग्न मंगळसूत्र अन् संसार सोपस्कार होता
 
-  निलेश पंडित
११ मे २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा