हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १५ मे, २०२०

चौकीदार


वाटते कानास जे जे गोड ते तो बोलतो
पाहते स्वप्ने प्रजा अन् तो सुखाने घोरतो

मागतो तो रोज पैसे कर भरा द्या देणग्या
आणि मग जनतेकडे उरले किती ते मोजतो

वेळ थोडासा मला द्या आणि मग किमया बघा
कैक वर्षे लोटली पण हेच म्हणतो रोज तो

चोर होते सर्व अंधारातले पूर्वी छुपे
हा इथे दिवसाउजेडी सर्वकाही चोरतो

आगळा येथे दरोडा आगळी राखण इथे
लोक ओरडताच चौकीदार इथला झोपतो

जे प्रवाहाच्या दिशेने पोहती ते वाचती
मात्र तो मरतोच जो उलट्या दिशेने पोहतो

पूर्वजांनी विकृती ही संस्कृती हे रुजविले
पाप त्यांनी पेरले अन् भोग आम्ही भोगतो


- निलेश पंडित
१६ मे २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा