हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

निरपराध

 

तो प्रकाशात जन्मून वाढला होता

राहिला तमापासून नेहमी दूर

पाळल्या कल्पना शुचितेच्या ज्या त्याने

त्यांच्या कैफातच रोज असे तो चूर


अवतीभवतीची अगणित सूत्रे त्याला

लाभली उमगली स्थितीजन्यतेतून

जे मुळात होते सुंदर सुरचित सारे

सुख अधिक मिळविले त्याने त्यापासून


यायचीच होती ... आली सायंकाळ

अंधारत गेला हळूहळू भवताल

पडता कानावर किरकिर रातकिड्यांची

चुकचुकली मनात भयशकुनाची पाल


भयकंपित झाला थरथरला तो आधी

आरोप मनोमन अंधारावर केले

पाऊल टाकता तमात गरजेपोटी

मन देहावर आघात अकल्पित झाले


मग जळला सुंभ परंतू पीळ न गेला

तो नित्य प्रकाशाचीच गातसे किर्ती

जो स्पर्श व्यथेचा कधी टाळला त्याने

त्यानेच घातला विळखा त्याच्याभवती


जगते आहे सातवी पिढी नंतरची

"निरपराध आम्ही" हे तीही कुजबुजते

तो प्रकाश देऊ ना शकला इतरांना 

अन् ही तुरळक किरणांसाठी तळमळते



- निलेश पंडित

१० आॅक्टोबर २०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा