चाचपतो कसाबसा
भीतीने कानाकोपरा
किड्यामुंगीचा मी दंश
सोसता होतो घाबरा
शोधतो मी प्रयासाने
इथे तिथे चोहीकडे
अंधारात कवडसा
त्यास घालतो साकडे
गवसून कवडसा
होता त्याचीच तिरिप
सूर्य बाहेर तळपे
आत होई उघडीप
मग उघडती दारे
आणि कवाडे सारीच
दिसे प्रकाश सर्वत्र
पुन्हा भांबावतो मीच
सूर्यप्रकाशात येता
डोळ्यांसमोर अंधारी
अंधाराच्याच दिशेने
परततो मी माघारी
कुठे सुरुवात होते
कुठे संपावा हा खेळ
ह्याचादेखील संतत
बदलतो ताळमेळ
- निलेश पंडित
२२ डिसेंबर २०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा