हा ब्लॉग शोधा

रविवार, १५ जुलै, २०१२

विसर

सूर लागत जाती तसे
का रे गळा होतो क्षीण?
वस्त्र रुळत जाता अंगी
विरते आणि उसवे वीण?

तीळ तीळ तुटून जेव्हा
संसारात लागे जीव
तेव्हा होते सुरू झीज
ग्रासे एक एक उणीव

सौंदर्याचे मिळे ज्ञान
तेव्हा अधू होइ दृष्टी
हिरवाइची येता जाण
का रे झडे सत्य सृष्टी?

शक्ती देउन हातांना
बांधतोस माझे पाय...
विसरू नये तुलाच कधी
म्हणून हे करतोस काय?

- निलेश पंडित
१४ जुलै २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा