अंतर
 
 थबकतो..वळतो...डोकावतो..
 हळुवार भयाण अंतरात
 मिसळलेले किरण दिसतात
 प्रकाशाचे काळोखात
 थिजलेल्या...
 सर्वांगी दिसते
 आतुरलेली सुप्त गती
 दडलेले क्षण
 भवितव्याचे
 आवाक्यातील भव्य मिती
 
 शांत स्तब्ध कवचातील दिसतो
 रसरसता तेजोमय लाव्हा
 चिताभस्म
 परिधान करीतसे
 मनस्वितेचा
 हिरवा रावा
 
 पांढुरलेल्या केसांमध्ये
 बटाही दिसती
 तलम रुपेरी
 पांगुळलेल्या देहमनावर
 झळझळणारे
 क्षण सोनेरी
 
 परतुनी जातो
 जगी माघारा
 जेव्हा सोडून भयाण अंतर
 विचार राहे
 एक सुखाचा
 विहरीन येथे...
 कधी निरंतर...
 
 - निलेश पंडित
 ३ जुलै २०११
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा