हा ब्लॉग शोधा

बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

तारतम्य

घ्यावी कैशी काही भूमिका
व्यर्थ भासते अहमहमिका
आपलं खरं सिद्ध करण्या
समजून मूर्ख एकमेका...
नमस्काराचे जोडता हात
कुठेतरी....आतल्या आत...
बरे वाटून लागते झोप...
का मग बौद्धिक खटाटोप?
...परंतु टाकतात अक्कल गहाण
माणसे...श्रद्धा वाढता वाढून
तेव्हा वाटते डोळस व्हावे
अंधपणाची कवचे फोडून
धर्म पंथ परंपरांच्या
बडेजावाचा येतो वीट
अविकसित कळपांहून पण
अशी माणसे जगतात नीट!
"कलोपासना", "भक्ती कलेची"
म्हणत म्हणत होतात लिलाव
वाढून भपका आणि वलयं
जन्मा येतात "दुसरे बाजीराव"
कलेस वेढतात दारूचे पेले
राजकीय रंगात रंगवलेले
संपतात श्रम...उरतो आभास
फुलण्या आधीच होतो -हास
.......................................
अति सर्वत्र वर्जयेत
महत्वाचं तारतम्य
दूर दूर जाता गवसे
दोन्ही धृवांत
केवळ साम्य...


- निलेश पंडित
१३ ऑगस्ट २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा