हा ब्लॉग शोधा

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

अश्वत्थामा


खरेच सांगा....दोष कुणाचा वृत्ती मधला?
अठरा विश्वे दारिद्रया तच जन्म घेतला
............. दूध मिळेना - पेज प्यायलो अगतिकतेने
वाहत गेलो इमान नंतर मी सत्तेला

सत्य लपवुनी कुणी फसविले पित्यास माझ्या
सोशित गेलो झळा सदोदित अन्यायाच्या
............. भले मिळाले ब्रम्हास्त्र तरी अर्धे मुर्धे
खलनायक बनलो पानांवर इतिहासाच्या

भळभळत्या जखमेस्तव चंदन मागत फिरतो
इथे तिथे वणवण भटकत जगभर भिरभिरतो
............. भयाण ग्रासे महारोग माझ्या जखमेला
अमरत्वाचा त्यात शाप...मी जिवंत उरतो

परंतु आता खेळ कलीचे कळती सारे
अश्वत्थामे इथे किती फिरतात बिचारे !
............. नियती देते अर्धे दानच पदरी त्यांच्या
ओल्या जखमांवरती पडती खारे वारे


- निलेश पंडित
२५ नोव्हेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा