हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१२

संयम


नको शीळ अन् नकोत खलिते प्रणयाचा तो मोह नको
नंतरचा जो....घात भयंकर ...तो दुःखाचा डोह नको

वसंतातली हिरवाई मी दुरून बघतो आताशा
एकच ठाउक....वैशाखातिल वणव्याचा मज द्रोह नको

चमचमणारी कवच कुंडले...आभुषणे मी दान दिली
सोने व्हावे शरिराचे ...गंजुन गेलेले लोह नको

किती गायिल्या राग रागिण्या...सूर गुंजले गोड सखे
अता वाटते साधासा ही आरोह नि अवरोह नको

शूभ्र चांदणे, गार हवा...पण मी संयम राखत जातो
मुरड घालणे बरे मनाला शरिराचा विद्रोह नको

- निलेश पंडित
१० नोव्हेम्बर २०१२

२ टिप्पण्या:

  1. " तुमची कविता अध्यात्मिकतेकडे.." इतके टाईप करून झाले आणि तेवढयात 'आज माझ्या वेदनेला' ची आठवण झाली.

    उत्तर द्याहटवा