हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१२

धाव


मी धावलो
सा-यांसाठी
सारे जात राहिले दूर....
थांबलो
तरी मनी वसे
आठवणींचा महापूर....

बेगडी यशाची लखलख...
वर संपत्तीचा मोह....
वरपांगी आत्मविश्वास
आत भीतीचा डोह....

एका...
थकल्या भागल्या विटल्या मिटल्या क्षणी
क्षितिजांवर दृष्टी खिळली
स्थिरता आली मनी

...आलो ज्या रस्त्याने
तो थोडा निरखला...
दिसला..न दिसला....पुढे जो
तो थोडा पारखला...

तगमग आता वृत्तींची
माझं नित्य जग झाली
अज्ञाताची संतत भीती
जीवनाची प्रीती ल्याली

धावतो सारेच...
मीही त्यांत !
सारे जवळ
सारेच दूर..
जगणे झाले
सुरेल गाणे
उरात भरले
सारे सूर !

- निलेश पंडित
२१ ऑक्टोबर २०१०

२ टिप्पण्या:

 1. ही जरा अवघड वाटली म्हणून थोडे अधिक खोलात जायचं ठरवलं - बघा बरोबर आहे का ?

  सार्‍यांचे बनून रहावे म्हणून मी खूप धडपड केली, पण दरवेळी ते साध्य होता होता रहात गेले, आणि मी मात्र अस्वस्थ होत गेलो.
  आणि थांबलो तर ही भीती की एकटाच तर मागे नाही ना रहाणार ? असे नायकास वाटते
  आर्थिक सुबत्तेसाठी केली जाणारी धडपड, त्यात मिळणारी सफलता ही फक्त वरवरची आहे.
  खोल कुठेतरी, हा यशाचा आत्मविश्वास तकलादू आहे याची अटळ जाणीव त्याला होते
  काय करावे, जे संतत नाही त्यासाठी चाललेली धावपळ थांबवावी की जे आहे ते टिकवण्यासाठी कष्ट चालू ठेवावेत - या संभ्रमात नायक काही क्षण स्तब्ध होतो -
  आणि तोच कलाटणीचा क्षण ठरतो. तो नायकाला एक नवा दृष्टिकोन देऊन जातो. आणि नायकाचे मन स्थिर होते.
  आपण जे जगलो, जगतो आहोत आणि जगणार आहोत त्याचा साकल्याने विचार नायकाने केला.
  थोडे सिंहावलोकन करताच हे समजले, की सगळे दूर जात आहेत असे सारखे सारखे वाटते कारण सगळेच धावत आहेत.
  कधी दूर तर कधी जवळ. आणि मग या जाणीवेतून वाटलेले शांतपण. की आपण कधीच एकटे नव्हतो.
  पण आपण आणि इतर सगळे नेहमीच समांतर राहू. जे नश्वर आहे ते निघून जाईल. शाश्वत आहे ते नेहमीच सोबत राहील.
  मग कसली काळजी ? आता जे जगतो तेच आनंद घेत पुरेपूर जगता येईल असा विश्वास नायकाच्या मनात उदयास आला..
  आणि जीवन ही धावाधाव न रहाता एक सुंदर मैफिल होऊन गेली.. नव्हे, ते तसेच होते हेही उमगले..

  उत्तर द्याहटवा