हा ब्लॉग शोधा

रविवार, २४ मार्च, २०१३

प्रसंग


छोटेच असतात प्रसंग
मोठे भासतात...मनात साचतात
मनाला काचतात

घाईगर्दीची सकाळची वेळ
कर्कश वाजलेली डोअरबेल
अचानक आलेली जेनी
तिच्या डोळ्यांत जळते निखारे
तोंडातून वाफाळलेले वारे
प्रत्येक शब्दाला संतापाचे कंगोरे

माझी कर्णभेदी हाक
"अण्णा...ताबडतोब बाहेर या!!"
त्यानंतर मी मांडलेला गोंधळ
पार्किन्सन मुळे त्यांची लटलट
स्वतःच्याच सद-याशी अस्वस्थ चाळा
माझ्या शब्दांनी मनाची होरपळ

"..डोळ्यांवर ताबा हवा...
आईला जाऊन फक्त दोन वर्षं झाली...
ही तुमची प्रभात फेरी?
या तुमच्या मुली एवढ्या पोरी...
निवृत्त प्राध्यापक ना?
लाज वाटायला हवी अण्णा..."

त्यांची अगतिक थरथर
स्वयंपाक घरातून बाहेर येत पल्लवीचा प्रश्न
"...का डोक्यावर घेताय घर?"
त्याच क्षणी जायला उठलेल्या जेनीचा
...पडलेला पदर
माझी चलबिचल
प्रश्नाकडे दुर्लक्ष आणि
...गडबडलेली अस्वस्थ नजर

छोटेच असतात प्रसंग
मोठे भासतात
मनात साचतात
मनाला काचतात

पुढे आयुष्यभर डाचतात....
आयुष्यभर डाचतात


- निलेश पंडित
२४ मार्च २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा