हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २६ मार्च, २०१३

दुकान

(वृत्त: हरिभगिनी)

या हो या...या सारे या...स्वप्नांच्या बाजारा या
स्वप्न विका अन् यश मिळवा - जमवा मग भक्कम माया

बाजाराच्या नियमांची जगावेगळी घडण इथे
कंत्राटाची गरज नसे, तर्काचेही स्थान थिटे

दुकानात येणा-याला नको "गि-हाइक"..."भक्त" म्हणा
गंडा बांधा अन झुकवा, तोडा त्याचा ताठ कणा

"स्वप्नांची पूर्ती होते...पुढल्या जन्मी" हे सांगा
लागतील तुमच्या दारी, तिष्ठत भ्रमणा-या रांगा

भाषेवरती जोर हवा, सात्विकतेची छबी हवी
सांगावी शिष्यांकरवी, दिव्यकथा मग नवी नवी

निश्चित उत्तर टाळत जा, प्रश्नावरती प्रश्न करा
आधाराला जाडासा, बगलेमध्ये ग्रंथ धरा

एकवटा सारी गात्रे, अन् गात्रांना फोल म्हणा
संपताच शस्त्रे काढा, क्रोधाचा फुत्कारफणा

युगा युगांची पेठ खरी, या धंद्या बरकत न्यारी
सहज यशाचा मार्ग भला, दंशच पेरू अंधारी !


- निलेश पंडित
४ ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा