हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

अस्वस्थता

(वृत्त: हरिभगिनी)

स्वच्छ खुल्याशा प्रकाशातही अस्फुट कुरबुर का डाचे?
हळू हळू थोडीशी अंधाराची भीती का साचे?

कुरबुर असते स्वतःचीच … ती स्वतःलाच टोचत जाते
वसंतातही पानगळीशी … शिशिराशी जोडे नाते

पिलांस अपुल्या पंख लाभता आनंदा येई भरते
पुढील एकाकी हृदयाचे ही तेव्हा कीर्तन करते

गतीमान लखलखती दुनिया अद्भुत जेव्हा मज भासे
तेव्हा ही स्वप्नात आणते जुनेच सैतानी फासे

किती पर्वण्या हिच्या मुळे हातातुन निसटुनशा गेल्या
किती परंतू संकटकाळांशी गाठी भेटी टळल्या

अनेकदा मी हिला लपवतो - हिच्या पासुनी मी लपतो
खोल मनाच्या कोपऱ्यात पण कुठेतरी तिजला जपतो !


- निलेश पंडित
१४ एप्रिल २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा