हा ब्लॉग शोधा

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

ध्यास


(वृत्त: व्योमगंगा)

ध्यास घेतो सारखा स्वप्नातही तुज पाहतो मी
भेटतो प्रत्यक्ष तेव्हा का असा भांबावतो मी?

त्या खळीच्या जीवघेण्या वेदनेचा त्रास होतो
खालचा मग ओठ माझा हाय नकळत चावतो मी

बंद खिडकीच्या तुझ्या काचेत छाया फक्त दिसते
विश्व त्यातुन कल्पनांचे फुलवुनी नादावतो मी

मोगऱ्याच्या धुंद गंधाने तुझी चाहूल येता
अंगणी माझ्या जरासा मोगराही लावतो मी

'पंडिता'ला तू पहावे ना पहावे … खंत नाही
स्वप्न माझे मीच रचतो त्यात अन सामावतो मी


- निलेश पंडित
४ सप्टेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा