हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१३

कोडे

(वृत्त: शार्दूल विक्रीडित)

आहे थोर उदात्त दिव्य धरणी देशात माझ्या इथे
भाषा, पंथ, कला अनेक फुलती वर्षानुवर्षे जिथे
तंत्रज्ञान नि शिक्षणादि सुविधा तैशी कृषीसंपदा
तेजस्वी इतिहास येथ दिपवी अभ्यासकां सर्वदा

वस्त्रे उत्तम रेशमी भरजरी नाना तऱ्हांची किती
नृत्ये, गायन आदि वेधक कला नाही तयांना मिती
ग्रंथांची इथल्या अमाप महती पांडित्य गाढे तसे
साहित्यातहि नित्य येथ दिसती अत्युच्चतेचे ठसे

स्वातंत्र्यास्तव शूरवीर लढले प्राणानिशी झुंजले
देशाचे बहुमोल स्वत्व जपण्या देहासही त्यागले
स्वप्ने गोड नितांत सुंदर मनी सारे इथे पाहती
देशातील सुवर्ण काल महिमा स्वप्नांत सांभाळती

ऐसा थोर समर्थ देश असता कोडे पडे एक ते
सोडायास …. व्हिसा लगेच मिळण्या … गर्दी कशी लोटते?


- निलेश पंडित
१५ नोव्हेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा