हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

सदा

पहाट होता बर्फ वितळतो 
सदा जागतो, सोंग गवसते
उलगडत्या दिवसाच्या पोटी
रास दिवास्वप्नांची वसते

क्षणाक्षणांचे मणी शेलके
काळ माळतो गळ्याभोवती
कोमल त्या फासात मनाच्या
सुखस्वप्नांची चाले चलती

हिरेमाणके आणिक सोने
गळ्याभोवती, खिशामधेही
तरी दरिद्री सदा राहतो
अंतरातुनी - तसाच देही

होते जेव्हां खिसे रिकामे
मणी क्षणांचे असेच होते
टळले नाहित तेव्हाही हे
सुखस्वप्नांचे अगणित गोते

स्वप्ने झाली पुरी तरीही
सदा वेदना सोसत जातो
त्वचेस पडती अधिक सुरकुत्या
काळ यमाचे गाणे गातो

घाम गिळुन दिवसादिवसाला
जग सारे मग हलते डुलते
बर्फ होउनी सदा झोपतो
…. पुन्हा एक तारीख बदलते



- निलेश पंडित
२० नोव्हेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा