हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३

खोल

(वृत्त: शिखरिणी)

निसर्गाच्या लीला अगणित किती रम्य दिसती
अगम्याची सारी सतत प्रचिती त्यातच किती
ऋतूंचे नित्याचे बदल सगळे लुब्ध करती
नद्यानाले ओढे झुळुझुळु जणू नाद धरती

मनुष्याची काया अविरत तशी चालत असे
मनादेहामध्ये सळसळ मृदू मुक्त विलसे
शरीराची व्याप्ती … अति विविधता त्यांत गवसे
नसा-मज्जा जाळे चपखलपणे त्यांतच वसे

अचंबा वाटावा खचितच कुणा निश्चित अशा
चमत्काराच्या या अमित प्रतिमा मोहक जशा
समाधानाने या मनन करण्या योग्यच तशा
जगी सौंदर्याची सहजच दिसे लोभस दिशा

परी खोलामध्ये जळजळित का वीष असते?
उरी लाव्हारूपी कुरुप फसवी कीड वसते!


- निलेश पंडित
८ नोव्हेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा