हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

जागा

(वृत्त: अनलज्वाला)

निर्मनुष्य वाड्यावर जेव्हा परवा गेलो
अनपेक्षित अनुभूतीने मी जरा चरकलो

फुटक्या कौलांमधून येते तिरीप खाली
धूलिकणांच्या अंगी मिरवत लक्ष मशाली

अंधाऱ्या ओसरीस थोडा प्रकाश देते
अवघडलेल्या सुन्न मनाला मागे नेते

भल्या थोरल्या कोळ्याच्या जाळ्यातुन दिसते
शिसवी खुर्ची आठवणींचे दालन बनते

कधी डुगडुगे गांभीर्याने … आता स्थिर ती
कुणी करारी कधी बसे त्या खुर्चीवरती

डुगडुगणाऱ्या खुर्चीने पाहिले किती स्तर
धनामनाचे … मानाचेही विचित्र अंतर

तशी पाहिली प्रगती आणिक अधोगतीही
पावित्र्याच्या फोल कल्पना … मूढ मतीही

दाखवतो साम्राज्य धुळीचे प्रकाश आता
धुळीत ज्या विरली सारी उद्दाम आढ्यता

वाड्यामधून परत निघालो जेव्हा परवा
मला वाटले काळच नमवी अखेर सर्वां

विचार करता परंतु थोडा … खोल जरासा
दिसतो आहे काळावर सैतानी फासा

वाडे गेले … स्तरांत झाली अदलाबदली
डुगडुगणाऱ्या खुर्च्यांची जागाच बदलली


- निलेश पंडित
२९ सप्टेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा