हा ब्लॉग शोधा

रविवार, २२ डिसेंबर, २०१३

वृष्टी

(वृत्त: वनहरिणी)

आज पाहता वळून मागे अनंत रूपे तुझीच दिसती
अशीच काही भविष्यातही अनपेक्षितशी खचितच वसती

बरस बरस तू बरस असा अन् आयुष्याचे वसव, उसव क्षण
कृष्ण, धवल वा हरित असो पण क्षणाक्षणा लाभो तव तोरण

पहिली वृष्टी वत्सलतेची अजून देते ऊब आगळी
ऊबेतुन जन्मली, साठली जिजीविषा अन् ऊर्मी सगळी

दुसरी वृष्टी प्रखर उन्हाची जाळित जाणारी कायेला
शिकलो कैसे विषवृक्षाच्या टाळावे जहरी छायेला

अशाश्वताच्या, चिरंतनाच्या आनंदाची तिसरी वृष्टी
मोहक मज मग भासत गेली हरित-रुक्ष मायावी सृष्टी

तू असल्याने पृथ्वी खुलते कोरड सलते दडी मारिता
पण मिळतो आधार मनाला दैनंदिन मज जगण्याकरिता

बरस बरस तू बरस असा मी तवतत्वाने  न्हाउन घ्यावे
नखशिखांत मग तन्मयतेने अद्वैती समरसून जावे


- निलेश पंडित
२३ डिसेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा