हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १७ एप्रिल, २०१४

नजर


नजरेने एका चिकित्सकाच्या जेव्हा
पाहिली स्वतःची नजर फक्त मी तेव्हा
चमकलो, थबकलो, अंतर्मुखही झालो
भासली जशी शब्दा-वाचे विण जिव्हा

लाचार कधी असहाय्य कधी होणारी 
काटेरी संतापाने जळजळणारी
चुकवून नजर माझीच नजर भिरभिरते
ओशट मोहांनी अवचित लिबलिबणारी

पण सुखद शांत अन् उदात्त ही असते ती
भरभरून जेव्हा स्त्रवते तीतुन नीती
वा न्यायाने जरबेने खिळते केव्हा
अन् कधी पापण्या अश्रूंनी थबथबती

आताशा तिजला एकच जागा छळते
ठरते, खिळते - जे गवसे तेच कवळते
अस्वस्थ तरीही राही अपूर्णतेने
अन् पुन्हा पुन्हा मग अंतर्यामी वळते

होईल कधी पण तिची यातुनी सुटका
अदृश्य दृश्य होण्याची येता घटका
न्हाऊन कधी ती पूर्णत्वाने पूर्ण
त्यागेल कोन जो फसवा… त्रोटक … विटका

- निलेश पंडित
१८ एप्रिल २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा