हा ब्लॉग शोधा

रविवार, २० एप्रिल, २०१४

अर्थ


डोळ्यांत
पाण्याचा टिपूसही न आणता
थरथरत्या हातांनी पण
ठाम निश्चयाने
काल वाचली
मी माझी डायरी

बरेच उष्ण श्वास
काही वाळलेल्या अश्रूंचे डाग
न संपणाऱ्या स्मृतींचा
न लागणारा थांग
कधी गरजेपेक्षा जास्त पसरलेली
तर कधी नको तेव्हा सुकलेली
वेगवेगळ्या रंगांची शाई
अचानक सापडलेली
जुनी शंभराची नोट
बऱ्याचशा
शुद्ध व्याकरण
आणि सुंदर हस्ताक्षर
यांनी नटलेल्या निरर्थक ओळी
काही जीर्ण फाटलेली पानं
आणि जुनी पुराणी विरत चाललेली बांधणी
हे सर्व पाहून बंद केली

शांतपणे खाली ठेवून
डोळे मिटताना उमजलं …
अर्थ तर भरला होता
सर्व कोऱ्या पानांमध्ये


- निलेश पंडित
२१ एप्रिल २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा