हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २४ एप्रिल, २०१४

सवाल


कशास द्यावे कुणास काही
घेणारा मी कोण … कोण तू?
देणे घेणे झाले का रे
मनात हा जर उरतो किंतू?

तसेच मी ही काय दिले तुज
स्वरूप अन् शब्दांची झालर
भीतीच्या गाभ्याला जपले
भाव पेरला थोडा त्यावर

स्वरूप, झालर, काळ बदलले
पण भीतीचा गाभा टिकला
संदेहाचे कारण झाले
देह तुला मी उगाच विकला

मी अन् माझ्यासम सारे जे
फोफावत गेले अव्याहत
फोफावुन तू त्यांच्यावरती
गाजवीत गेलास हुकूमत

दिले घेतले नाही काही
पायामध्ये पाय अडकले
गती थांबली तुझी नि माझी
उगाच माथे मात्र भडकले

खूप विचारांती आताशा
मनातून मी तुला त्यागतो
तुझी नि माझी दोघांचीही
जागा आता मीच व्यापतो

त्यानंतरही मनात माझ्या
सवाल उरतो एक परंतू
दिले घेतले कुणी काय अन्
उरलेला जो तो मी का तू?


- निलेश पंडित
२५ एप्रिल २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा