हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ८ मे, २०१४

मूल्ये

(वृत्त: शार्दूलविक्रीडित)

मूल्यांची महती अपार जगती जेथे पहावे तिथे
पायाभूत तयांस सर्व म्हणती अभ्यासकांचे जथे
शांती, न्याय, सहिष्णुता नि समता यांची महत्ता जशी
निष्ठा, शिक्षण, प्रेम, मान, शुचिता, श्रद्धा, सुबत्ता तशी

सारा देश समर्थ, स्वस्थ असण्या मूल्ये नि नीती हवी
समृद्धी व विकास नित्य घडण्या दृष्टी असावी नवी
शेती, उद्यम योजना चहुकडे सर्वांस व्हाव्या खुल्या
लाभाव्या सकलां अमाप सुविधा सर्वत्र अन् चांगल्या

चाले जी वहिवाट रोज सगळी मूल्यांमुळे नेहमी
देते ती जगण्यास ठाम सकलां शांती, सुखाची हमी
कष्टाने वसती सदैव सगळे विश्वास राही मनी
मानव्यात अजून काय असते उत्कृष्ट ते याहुनी?

सांगायास बघा जरा विसरलो मूल्ये बडी यांतली
… शक्ती घोर सदैव ज्ञात असू द्या शक्ती नि भीतीतली


- निलेश पंडित
८ मे २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा