हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १३ जून, २०१४

कासावीस


कासावीस
होतो मी जरासा
कल्पना विश्वातील
उदात्त शब्दशिल्प किंवा
तंबोऱ्यात कसाबसा
मिसळलेला सूर
प्रस्तुत करून

एखादी प्रतिक्रिया ....
माझ्याच चार ओळींवर
वा मैफिलीत
सोप्या सुंदर
किंवा अवघड जागेवर
येणारी दाद ....
घेऊन येतात
स्पष्ट … अस्पष्ट
खोल … उथळ
तर्क, मतं, मतांतरं
ठायी … अनाठायी
अश्रू अथवा हास्य
आणि नेतात मला
खोल अंतर्मनांच्या
प्रवासास …
जिथे जाणवतं
आहेत काही
माझ्या अंतर्मनाचा
वेध घेणाऱ्या वाटाही
तिथेच
पण नेमक्या मला मात्र
न सापडणाऱ्या
ज्यांच्या सतत जाणवणाऱ्या
अस्तित्वानं
होतो मी जरासा
कासावीस


- निलेश पंडित
१४ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा