हा ब्लॉग शोधा

शनिवार, १४ जून, २०१४

नशा


स्वप्नांचे अस्तित्व । चिरंतन सत्य
स्वप्ने सर्व नित्य । पाहू या हो ।।

वाढवू या सारा । स्वप्न सत्य गुंता
दूर होई चिंता । नशेवाटे ।।

तर्कहीनतेचे । फुटूनिया पेव
व्यर्थ उठाठेव । बरी वाटे ।।

सर्वांगी सात्विक । स्वप्न विके कोणी
मिळे त्यास लोणी । ताक आम्हां ।।

दुधाची गरज । ताकाने भागवू
अधिक भिनवू । स्वप्ने अंगी ।।

ज्यांच्या नशिबात । ताकसुद्धा नाही
त्यांची चिंता वाही । भगवंत ।।

दिवसागणिक । संख्या वाढे त्यांची
ही का विक्रेत्यांची । चूक आहे?

आपण करावी । स्वप्नात मुजोरी
जगण्या शिदोरी । स्वप्नांचीच ।।

देवा मायबापा । उघडो ना डोळा
आमचा हा चाळा । चालताना ।।

स्वप्नांच्या नशेत। जगावे मरावे
नशेत बघावे । फक्त स्वप्न ।।


- निलेश पंडित
१५ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा