हा ब्लॉग शोधा

शनिवार, १९ जुलै, २०१४

फस्त

(वृत्त: आनंदकंद)

जातो जगून कोणी जातो मरून कोणी
लाखात एक केवळ जातो उरून कोणी

गाळीत घाम येथे आयुष्य वेचती जे
त्यांचीच फस्त शेते जातो करून कोणी

सीमेवरील हिंसा देशास राखताना
देशास ह्या अहिंसक गेले चरून कोणी

वरती तरंगती ते मरती बुडून जे जे 
धरुनी शवांस त्यांच्या जाती तरून कोणी

सात्विक सदैव भाषा साधी सुतीच वस्त्रे
इतक्यावरून मोठे गेले ठरून कोणी

कोडे कधी सुटे ना आजन्म 'पंडिता'चे
जाती करून कोणी जाती भरून कोणी

- निलेश पंडित
२० जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा