एखाद्या थोर व्यक्तीवर कविता लिहावी असा एक विचार मध्यंतरी माझ्या आणि
वर्षा कुलकर्णींच्या चर्चेत आमच्या मनात आला तेव्हा मला वाटलं की मी
कुसुमाग्रजांवर लिहावं. जेव्हा लिहायला बसलो तेव्हा मात्र जाणवलं की
कुसुमाग्रजांच्या वाङ्मयाचा एवढा दृढ आणि खोल परिणाम सुमारे गेली तीस वर्षं
माझ्या मनावर झालेला आहे की चार कवितेच्या ओळी लिहून त्याला न्याय देणं
मला शक्य नाही. म्हणून गद्य पद्याचा ओघ जसा सुचेल तसा मांडावा आणि तुटपुंजा
का होईना थोडासा न्याय "कुसुमाग्रजांचं काव्य आणि मी" या विषयाला द्यावा
असं मी ठरवलं.
याचा अर्थ मी कुसुमाग्रजांचं सगळं लिखाण वाचलेलं आहे असा नाही. पण जे काही थोडंफार वाचलंय त्याचाच पगडा मनावर इतका आहे की मी भारावून त्यांचा आजन्म ऋणी झालो आहे असं म्हणणं वावगं ठरू नये आणि असे त्यांचे असंख्य वाचक असतील यात शंका नाही. (सहज मांडणी व्हावी आणि तरी सर्व काही मांडता यावं या दृष्टीने पादाकुलक मनात आलं हा माझ्यावरील प्रभाव मर्ढेकरांचा हे मात्र थोडं चमत्कारिक असलं तरी सत्य आहे!)
(खोल मनाच्या गूढ तळाशी
पुन्हा पुन्हा विहरतो जसा मी
माझ्या अस्तित्वावर तुमची
छाप मला आढळे नेहमी)
हे कुसुमाग्रजांना उद्देशून म्हणावंसं वाटतं.
मनात प्रथम येतात ती निरनिराळी नाती.
(नाती आकलना पलिकडली
सहजसाध्य आम्हाला झाली
वहिवाटीची जीवनशैली
अकल्पिताचे पीयुष प्याली
अवचित झाल्या मनामनांच्या
अदृश्याच्या रेशिमगाठी
संज्ञांविण नात्यांनी केली
जन्मभराची जपणुक मोठी)
कुसुमाग्रजांनी तऱ्हेतऱ्हेच्या नात्यांना गौरवास्पद उंचीवर नेलं.
नात्यास नाव अपुल्या
देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्याची
जगतास जाण नाही
किंवा
… पण आहे जत्रेला शेवट
झोत विजेचे विझतिल सारे
पडतिल पडदे इंद्रपुरीवर
तमात उरतिल केवळ तारे
नदीकडेने वाट पुढे ती
भयाण निर्जन काळोखातुन
माहित मजला साथ कुणाची
तेथे नाही तुझियावाचुन
… अशा ओळींनी आयुष्यभराच्या सोबतीचा अनामिक करारच केला.
(गूढ त्यातही विशेष माझे
नाते माझ्याशी जडलेले
चार शब्द वाचताच तुमचे
निमूट अलगद उलगडलेले
उलगडुनीही असीम व्याप्ती
जाणवली … जाणवीत गेली
ओळख माझी माझ्याशी मग
अपूर्णतेनेही मोहरली)
कुसुमाग्रजांनी "मी" या विषयावर आणि "मी आणि मी यांचं नातं" यावर जे लिखाण केलं त्याला तोड नाही.
मी आणिक मी आम्ही दोघे
वस्तीसाठी एक परी घर
दोन धृवांचे मीलन येथे
दोन धृवांतिल राखुनि अंतर !
किंवा
पिशाच्च पण ते होते माझे
आपुलकीने स्वागत केले
गप्पा झाल्या
दूरपणाचे अंतर तुटले
आठवणींचे पर्व चाळता
काळिज कढले.
ह्या ओळींनी स्वतःची स्वतःशी जी वेगळी ओळख होते तिचं वर्णन गद्यात शक्य नाही. एकूणच "मी" हा विषय कुसुमाग्रजांनी अत्यंत ताकदीने हाताळून वाचकावर नम्रतेचा संस्कार व्हावा इतकं उत्तुंग काव्य निर्माण केलं.
एका छोट्याशा कवितेत ते म्हणतात
मीत्व आहे ।
एक केवळ ।
सर्व आणि सर्वथा ।।
तेच देते सर्वतेला ।
पंख आणिक ।
ही व्यथा ।।
(जन्मावे कांचन मातीतुन
अग्नीने वर त्या उजळावे
कविता फुलली तशीच तुमची
जिच्यात अवघे विश्व फुलावे)
कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये ही सर्वतेची भावना नेहमीच आढळते. किंबहुना एका बाजूला सामान्यत्व … नव्हे … अतिसामान्यत्व तर दुसऱ्या बाजूस नेमकं त्याच सामान्यत्वातून भरारी घेत - झेप घेत - जन्माला येणारं असामान्यत्व याचं त्यांना जबरदस्त आकर्षण असावं आणि या संकल्पनेवर त्यांचा दृढ विश्वास असावा अशी त्यांच्या मनातली गुंफण सदैव आढळते. केवळ दोन खोल्यांच्या साध्या संसारातून ज्ञानपीठ पुरस्कार यथार्थपणे प्राप्त करणारं "नटसम्राट" लिहिणं आणि त्याच तोलामोलाचे अनेक काव्यसंग्रह पुढील अनेक पिढ्यांना देऊन त्यांना आजन्म ऋणी करणं ही कुसुमाग्रजांची किमया अशीच असामान्यत्वाची द्योतक आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
त्यांच्या अनेक कवितांमध्ये हा पैलू केवळ आढळला नव्हे तर इतकी प्रखर स्फूर्ती देत गेला की कठीण प्रसंगी आयुष्य सोपं वाटावं.
सावरकरांवर लिहिलेल्या एका कवितेत कुसुमाग्रज म्हणतात
काळोखातुन याच पसरला असला दिव्य धुमारा
धुक्यातुनी वर तळपत आला एक तांबडा तारा
दुसऱ्या एका "खुळ्या - साध्या माणसांवर" लिहिलेल्या कवितेत ते लिहितात
जमावातुनी याच खुळ्यांच्या महाखुळे ते येती
जनावरांतुन माणसास जे पुढे जरासे नेती
(कुसुमाग्रज कवितेने तुमच्या
दिधली आम्हा जीवनदृष्टी
मिती लाभुनी किती अकल्पित
दिव्य जाहली पार्थिव सृष्टी
निःशब्दाचीही गुरुकिल्ली
शब्दांतुन अल्पशा गवसली
मूलतत्व जगण्याचे होउन
कविता तुमची हृदयी वसली)
कुसुमाग्रजांच्या कवितेच्या प्रत्येक पैलूचा परामर्श एखाद्या लेखात घेणं अशक्य आहे. एवढंच फार तर म्हणता येईल की नीती-मूल्ये-तत्वे यांचा सर्वसमावेश समुच्चय जणू कुसुमाग्रजांच्या कवितेच्या रूपाने वाचकाच्या हृदयात वसावा अशी ह्या कवितेची महती आहे. आमच्या पिढीचं हे भाग्य आम्हाला कुसुमाग्रजांची कविता वाचायला मिळाली.
- निलेश पंडित
१४ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा