हा ब्लॉग शोधा

सोमवार, २६ जानेवारी, २०१५

गुपित

(वृत्त: मंदाक्रांता)

औचित्त्याचे अखिल जगती नांदणे लोकशाही
सामान्यांना अमित क्षमता देतसे प्रेरणाही
प्रत्येकाला सतत समता सर्वथा सार्थ देणे
ह्या तत्वाला जपत करते मुक्त दाही दिशाही

शक्तीचे जे वितरण सदा सर्व लोकांत व्हावे
इष्टत्वाची सहज रचना त्यात व्हावी स्वभावे
लोकांमध्ये तरतम व्यथा योग्य वा युक्त नाही
ह्यासाठी ही जनमत खरे नेहमी आजमावे

राष्ट्रैक्याची उजळ प्रतिमा राहता विश्वव्यापी
त्यामध्येही बहुजन मती टाळणे ना कदापी
सर्वांगाने सधन बनुनी देश समृद्ध व्हावा
सर्वार्थाने सुखद सकलां स्वर्ग सर्वस्वरूपी

सूत्राचे ह्या गुपित अगदी सूक्ष्म जे गूढ राहे
सूज्ञत्वाची प्रथम प्रतिमा नीतिमत्तेत आहे


- निलेश पंडित
२६ जानेवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा