हा ब्लॉग शोधा

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५

क्षण

(वृत्त: भूपति)

मातीतुन उमले झाड त्यातुनी फूल
परि त्यात दडे निर्माल्याची चाहूल
खत, क्षार, जळाचा ऱ्हास पोसतो ज्याला
ते खोड पेटते चेतविण्याला चूल

भुइमूग रगडता तेल मिळावे त्यात
शोषून तेल ते जळत राहते वात
ज्वलनाच्या अंती राखच शिल्लक उरता
उजळते मात्र ह्या विलयामधुनी रात

नाशात दडावे उत्पत्तीचे मूल्य
झिजण्यात सोसणे आत्यंतिक वैफल्य
ह्या नाण्यालाही असती बाजू दोन
दुसरीत लाभते दुजा कुणा साफल्य

समरसतेने झिजताना जगताना मी
गुंततो कधी परिणतीत आता ना मी
क्षण हातामधला जगता पूर्णपणाने
जगण्याचा घडतो पोत भरजरी नामी


- निलेश पंडित
१ मार्च २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा