कधी स्तब्धता कधी चलबिचल
केव्हा दृढ तर केव्हा चंचल
दाह सोसता संतत अविचल
काळवंडते परी न झिजते ना कुरकुरते
कोप-यात ती साधी समई सदैव जळते
तेल एकदा मिळे सकाळी
कुणी कधी पुसतसे काजळी
मात्र एरवी जीर्ण देउळी
दिवसरात्र अन् कातरवेळी संथ तेवते
कोप-यात ती साधी समई सदैव जळते
भक्त देवदर्शनास येती
फुलेफळे देवास वाहती
हारतु-यांनी मढते मूर्ती
शांतपणे ह्या सर्वांसाठी उजेड धरते
कोप-यात ती साधी समई सदैव जळते
- निलेश पंडित
१३ मार्च २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा