हा ब्लॉग शोधा

शनिवार, ७ मार्च, २०१५

तारा


गच्च संपूर्ण भरीव
दीर्घ श्वास घेऊन
सोडताना -
डोळे मिटून
मिटल्या डोळ्यांसमोर
काहीही दिसल्यास
ते केवळ अलिप्तपणे बघण्याचा
आटोकाट प्रयत्न करताना -
विचारांमधील अर्थाच्या
त्रासदायक प्रखरतेला
दुरून न्याहाळताना -
भावनांच्या आंदोलनांना
हळूवारपणे
निरभ्र आकाशातील
संथ वा-याने
तरंगत दूर जाणा-या
ढगांना पहावं तसं
त्रयस्थपणे पाहताना -
वरवरच्या निरर्थक
कोलाहलाखाली दडलेल्या
अनेक सूक्ष्म
अर्थपूर्ण संवादांखाली पसरलेल्या
शांततेत झंकारणारा
माझ्याच आवाजाचा षड्ज
कानी पडतो
पण जुळत नाही
अंतरात

तेव्हा तिथे अडतो ... विरतो
श्वास माझा
आणि घेतो भरून
पुन्हा एक दीर्घ श्वास मी
पुन्हा एकदा
त्याच तारा छेडण्यासाठी
जुळवण्यासाठी


- निलेश पंडित
८ मार्च २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा