(वृत्त: अनलज्वाला)
खोल उराशी असते काही सदा सर्वदा
तेच जुने अन् वेध लागती पुन्हा एकदा
दैनिक जत्रा तऱ्हेतऱ्हेच्या सूर्यकणांची
अवसेमागे वसे शृंखला चंद्रकलांची
त्यांत मानवी अनंत किमया लख्ख दिव्यांची
भेदित पण ह्या साऱ्यांना तम विणतो कशिदा …
तेच जुने अन् ……
चलन चालते असंख्य श्वासांचे उन्मादक
फेसळते श्वासात उष्णसे जगणे मोहक
श्वास जन्मतो श्वासातूनच चालक वाहक
परी त्यात मृत्यूचा चाले अखंड सौदा
तेच जुने अन् ……
उमगत जातो जगण्याचा ह्यातून कायदा
निराशेत दडते आशाही हाच वायदा
असेच असणे स्विकारण्याचा खयाल उमदा
जिजीविषेची वीणा वाजे दिडदा दिडदा
तेच जुने अन् ……
- निलेश पंडित
७ मे २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा