हा ब्लॉग शोधा

शनिवार, १६ मे, २०१५

डंख

(सुनीता क्रिष्णन् ह्या समाजसेविकेच्या भूमिकेमुळे मिळालेल्या प्रेरणेतुन जन्मलेली कविता)

(वृत्त: पंचचामर)

अतर्क्य नित्य वागणे सदैव सोसणे उणे
उरी भरून कष्ट अन् अनंत मोह त्यागणे

असह्य यातना अतीव वेदना जिथे वसे
तिथेच हास्य नांदते मुखावरी तिच्या कसे

अभेद्य मंत्र एक जागता उरात नेहमी
परिस्थितीत घोरही प्रसन्नताच कायमी

मुली हताश देहविक्रयात गांजती जिथे
पुढे सरून स्थापिते पुनश्च सौख्य ही तिथे

प्रदीर्घकाल एक प्रश्न माझिया दडे मनी
अखंड कोणती हिच्यात दिव्यतेतली धुनी

अखेर जाणले तसाच घेतला तिने वसा
भयाण खोल डंख सोसला तिने कधी जसा

- निलेश पंडित
१७ मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा