रोज करतो साव असण्याचा इथे कावा कुणी
वाटतो जनतेस तो अवतार अकरावा कुणी
अर्धपोटी मी कशा ऐकू विकासाच्या कथा
अन्न, पाणी, हक्क जगण्याचा मला द्यावा कुणी
म्हणत 'हर हर' आपल्या जनतेस लुटती आपले
वीरतेचा ह्यात पोवाडा कसा गावा कुणी?
येत होता रोज येथे धूर सोन्याचा म्हणे
घ्या चितांचा वाढणाऱ्या आज आढावा कुणी
ज्ञात होते सर्व काही पूर्वजांना आमच्या
नेमका उपयोग त्याचा फक्त सांगावा कुणी
पाळणारा, चारणारा कापतो हा कायदा
न्याय तेथे कोणता कोणास मागावा कुणी?
- निलेश पंडित
१६ नोव्हेंबर २०१५
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा