हा ब्लॉग शोधा

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

गती


क्षणामागे क्षण । दिसामागे दिस
अखंड प्रवास । कसलासा ।।

प्रवासात मग्न । गतीज प्रवासी
संन्यासी विलासी । सारखेच ।।

काही चक्राकार । काही वक्राकार
गतीचे प्रकार । अगणित ।।

संथ धीमेपण । कुणास सोसते
कुणास भावते । द्रुतगती ।।

प्रखर उन्हात । संधीप्रकाशात
तशी अंधारात । गती चाले ।।

साऱ्या हव्यासात । मेख एक मोठी
सारे गतीसाठी । अगतिक ।।

काय हा विनोद । अंतीही संपेना
गतीची वल्गना । माणसाची ।।

मृत्यूची कुणास । लाभताच स्थिती
श्राद्धातून गती । कल्पितात ।।

नवल ते काय । अशा समाजास
गतीचा आभास । ग्रासे नित्य ।।

त्यातून जन्मते । वेगाने रुजते
सर्वत्र मुरते । अधोगती ।।


- निलेश पंडित
७ नोव्हेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा