हा ब्लॉग शोधा

शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

गूढकथा


वीस बावीस तासांच्या निघतो मी प्रवासास
अंतर्मुख होत जातो सोडताना स्वदेशास
…. गूढ उकलले तरी गूढ उरतेच काही
कोट्यावधी पेलतात मूठभरांचा हव्यास

नरबळी भानामती सतीसम घोर चाली
वाटचाल जळमटे अशी झटकत झाली
…. अज्ञाताला विज्ञानाने दिले अखंड आव्हान
सूक्ष्मातिसूक्ष्म सृष्टीही आली नियंत्रणाखाली

प्रश्न पडता गहन सज्ञान अज्ञाना सांगे
गुंतागुंत स्वीकारता उलगडतात धागे
…. स्वातंत्र्याच्या परिघात मात्र सारे अगतिक
भाबड्या आशेवरती मेंढ्या जाती मेंढ्यांमागे

समाज हाच कधी जो पारतंत्र्याशी लढला
पर्यायहीनतेपाशी लोकशाहीत अडला
…. अंधश्रद्धा टाळणारे भोळ्या आशेत जगती
प्रकाशास जागोजागी गूढ अंधार जडला

जगाच्या नकाशावर कुठे सूर्य उगवतो
त्याचवेळी कुठेतरी कुणा काळोख ग्रासतो


- निलेश पंडित
२७ डिसेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा