विविधतेतून एकता
पाशातच मुक्ती
ह्याचा प्रत्यय
आता देतो
नव्या युगातल्या
अभिमानशून्य हतबल जीवांच्या
अभिमानयुक्त घोषणांनी आशांनी
बरबटलेला
सामाजिकतेचा प्रत्येक अव्यय
गर्दीत हरवत जाणारी माणसं
धुरात लुप्त होत जाणारी हवा
श्रोत्यांचे आवाज प्राशून नष्ट करणारी
नव्या दमाची
जुनी भाषणं
गुन्हे करणारा कायदा
कायद्यात बसणारे गुन्हे
बंधनमुक्त स्वातंत्र्यात बंदिस्त
स्वतंत्र समाज
मृत्यूच्या सावलीत फोफावणारं
आयुष्य
अन् त्या आयुष्याला
वाढत्या वेगानं ग्रासणारा मृत्यू
फासातून श्वासात
श्वासातून फासात
तगणारी जगणारी
भाबडी आशा
सर्वत्र एकात्म
चिरंतन लय
अंगवळणी पडलेली
जगण्याची सवय
- निलेश पंडित
२९ फेब्रुवारी २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा