हा ब्लॉग शोधा

सोमवार, १४ मार्च, २०१६

व्यर्थ

व्यर्थ चिंता जंगलांचे काय झाले नेमके 
आदिवासींच्या खुणांचे काय झाले नेमके 

नेहमी एकत्र सारे नांदतो हे सांगती 
मारलेल्या स्त्रीभ्रुणांचे काय झाले नेमके 

रंगणाऱ्या भव्य चर्चा रोज आम्ही ऐकतो 
चिरडलेल्या घोषणांचे काय झाले नेमके 

रामकृष्णांचा अलौकिक वारसा दिसतो इथे 
कंस अन् दुर्योधनांचे काय झाले नेमके 

रोज प्रगती मोजण्याचे नवनवे परिमाण का 
नेमक्या आश्वासनांचे काय झाले नेमके 

आजही सारी विमाने फक्त परदेशातली 
दिव्य साऱ्या पुष्पकांचे काय झाले नेमके 

- निलेश पंडित 
१४ मार्च २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा