हा ब्लॉग शोधा

सोमवार, ४ एप्रिल, २०१६

द्रोह


राहून जे गेले । ते ते सारे हवे
हेच आम्हां ठावे । चिरंतन

नसे ही पोकळी । केवळ मोहाची
थोडीशी द्रोहाची । झाक त्यात

कळेना प्राप्त ते । केव्हा विसरलो
आणि भांबावलो । अजाणता

वाकुल्या दावित । पंचरंगी नाती
येती आणि जाती ।  निरंतर

अमृताचा वेष ।  आत विषवल्ली
झाली मात्र हल्ली ।  प्राणरूप

जीवाभावाच्यांचे ।  लाभते अस्तित्व
आताशा सदैव  ।  आंतर्जाली

जिण्याची साधने  ।  मौल्यवान दोन
कॉम्प्युटर फोन  ।  हीच आता

तंत्रज्ञानाचेच ।  गवसेना तंत्र
दोन्ही तंत्र मंत्र  ।  व्यर्थच की

विवेकाची वाट ।  तंत्रमंत्रापार
जाणीव अपार  ।  हीच अंती


- निलेश पंडित
५ एप्रिल २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा