हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३० मार्च, २०१६

जाणीव


मी वळून बघता मागे दिसती साऱ्या
खडबडीत अवघड धूसर विचित्र वाटा
अपवाद शांतशां क्वचितच एखादीचा
एरवी मात्र साचा अवघा उफराटा

विश्वास बसेना ह्या वाटांनी आलो
तो मीच खरा होतो का बद्ध प्रवासी
मी अगतिक गतीज नकळत पुरता झालो
भासलो जरी मी मला एक रहिवासी

आखल्या कधी ना वाटा ह्या मी माझ्या
नशिबात कधी गंतव्य ठरवणे नव्हते
हातात नकाशे कधी कोणते यावे
जाणवले नियती नकळत सर्व ठरवते

दुर्दैव त्यात ह्या ज्याच्या त्याच्या वाटा
इतरांस कुणा ना ह्याच नेमक्या मिळती
सुख एक मात्र दडलेले अवचित लाभे
वाटांच्या वाटांशीही गाठी पडती

गाठीत अशा गुरफटून अवघडलेला
मी सायंकाळीही रमलेला जीव
कवळून नेहमी उणीव केवळ जगलो
जगतो आहे मी एक नवी जाणीव

- निलेश पंडित
३० मार्च २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा