सत्य शिवाहुनि सुंदर हे ऐकून वाटते छान
सत्याची अनुभवता रूपे मात्र गळे अवसान
सत्य कल्पिता अचल चिरंतन पवित्र मंगल काही
गढूळ चंचल रुक्ष अमंगल दिसते दिशांत दाही
सत्य असावे सुंदर हा आपलाच असता ध्यास
ह्या ध्यासावर कित्येकांचा धंदा जमतो खास
सत्यावर चढविता मुलामा दिसे गोजिरे रूप
सत्य दडविता सहज वाटते सत्याचे अप्रूप
सत्याचा आभास भासतो मोहक हेही सत्य
आयुष्य उभे पार पाडती कितीक त्यातच नित्य
सत्यासत्याच्या गुंत्यामध्ये गुरफटता जीव
हुशार मानव मानवास बनवितो पशू पाळीव
मला हवे ते तसे असे की नसे तसे ही भीती
सत्यज्ञानाची बनते अवघ्या जगण्याची नीती
- निलेश पंडित
१२ नोव्हेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा