हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

खेळ

भिंत मोठी चीनची अन् नेत्रदीपक नायगारा
कोपरा प्रत्येक खंडाचा धृवांचा शीत वारा
.... सर्व किमया मानवी किंवा निसर्गातील मोठ्या
रोज धुंडाळीत गेलो गूढ विश्वाचा पसारा

ही अनिश्चितताच की हा खेळ दैवाचा म्हणावा
मी हजारो मैल असता दूर तो संदेश यावा
.... नातवाचा फक्त फोटो कवळला हातात असता
भेटण्याआधीच शेवटचा कुणी का श्वास घ्यावा

भव्य जे ते दिव्य जे ते पाहण्याचा ध्यास होता
तोडणे साधेपणा हा सूक्ष्मसा हव्यास होता
.... मात्र हातातून सारे योग्य ते अवचित निसटले
राजवस्त्राआत आता लाभला संन्यास होता

टाळणे मी ह्याच संन्यासास ठरले दिव्य काही
निसटणे स्वीकारतो अन् मानतो मी रसिकताही


- निलेश पंडित
१ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा